लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची वसतिगृहे म्हणजे फुले दांपत्याच्या स्त्री शिक्षण कार्याला सलाम..
बहुजन समाजातील लेकींना होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था देऊन लठ्ठे एज्युकेशन सोसायटी त्यांचे करिअर घडवते-प्रा.एन.डी.बिरनाळे
सांगली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०: जत, खानापूर,आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागातील बहुजन समाजातील लेकींना शिक्षण घेण्यासाठी लेडीज होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था करणारी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ही महात्मा जोतिबा, क्रांतीमाता सावित्रीमाई, उस्मान आणि फातिमा शेख यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा वारसा नेटाने पुढे नेणारी मानवता वादी शिक्षण संस्था आहे. संस्थेच्या या रचनात्मक कार्याला सॅल्युट..! आपली आई आणि सावित्रीमाई यांचा जन्मदिवस हाच व्हॅलेंटाइन डे आहे असे गौरवोद्गार प्रा.एन.डी.बिरनाळे यांनी काढले. आज जागतिक महिला दिन व क्रांतीमाता सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद काॅलेजच्या विश्रामबाग सांगली येथील लेडीज होस्टेलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याता म्हणून ते बोलत होते.

यावेळी प्रा.बिरनाळे म्हणाले की,चांगल्या होस्टेलमध्ये प्रवेश घेऊन दिलेल्या तुमच्या आई बाबांचे अभिनंदन.शहरात निर्भयपणे शिक्षण घेता यावे यासाठी उत्कृष्ट होस्टेल उपलब्ध करून दिले त्याबद्दल लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अभिनंदन. आवडेल तो अभ्यासक्रम पूर्ण करुन उत्कृष्ट करिअर करा. करिअर आणि कॅरॅक्टर यावर लक्ष केंद्रित करुन यशवंत, आयुष्यवंत,भाग्यवंत आणि श्रीमंत व्हा. कितीही मोठे व्हा परंतु नाती आणि माती,संस्था आणि होस्टेलचे उपकार विसरु नका. मुलींचा खरा अलंकार शिक्षण आहे असे कळंत्रे अक्का म्हणायच्या.

यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ, महाराणी अहिल्याबाई, सावित्रीमाई यांच्या कार्याचा उल्लेख करताना युसूफजाई मलाला यांच्यावर तालीबान्यांनी केलेला हल्ला व तिची स्त्री शिक्षणाची तळमळ मांडली. त्यावेळी मुलींचे डोळे पाणावले. मोबाईलचा दुरुपयोग नको.आई बाबा हेच आपले बाॅयफ्रेंड व गर्लफ्रेंड आहेत.आईचा आणि सावित्रीमाईंचा जन्मदिन हाच आपला व्हॅलेंटाइन डे आहे.होस्टेल व्यवस्थापनात सहकार्य करणाऱ्या सेवाभावी महिला व लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने होस्टेल अतिशय उत्तमप्रकारे चालू असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. स्वच्छता,टापटीप आणि नियंत्रण याकामी किरण व सौ.आश्विनी कणिरे यांचे काम लक्षवेधी असल्याचे सांगितले.

परिचय व आभार अनुजा पाटील या विद्यार्थ्यींनींने मानले. यावेळी होस्टेलमधील सर्व विद्यार्थ्यींनी व किरण आणि आश्विनी कणीरे हे उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.