अल्पावधीतच मूर्तीवर रासायनिक लेपन करावे लागल्याने संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करा-मंदिर महासंघ
श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेल्या रासायनिक लेपनास मंदिर महासंघ,वारकरी यांचा तीव्र विरोध- सुनील घनवट राष्ट्रीय संघटक मंदिर महासंघ
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/03/2025- महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष 2020 मध्येही ते करण्यात आले.त्यावेळीच पुढे 8 ते 10 वर्षे त्याला काही होणार नाही,असे सांगण्यात आले होते.त्यामुळे 4 वर्षांपूर्वीच लेपन केलेले असतांना ते परत परत का करावे लागते ? लेपन 4 वर्षांतच करावे लागते याचा अर्थ यापूर्वीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असेच म्हणावे लागेल.खरे पहाता देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणे, ही पूर्णत: धर्मशास्त्रविसंगत कृती आहे. मुळापासून उपाय न काढता रासायनिक लेपनासारखी वरवरची उपाययोजना काढल्याने देवतेच्या मूर्तीवर विपरित परिणाम होऊ शकतात हेही ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे. त्याच समवेत अल्पावधीत रासायनिक लेपन परत करावे लागल्याविषयी संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.
अशाच प्रकारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर वर्ष 2015 मध्ये मूर्तीवर वज्रलेपनाची प्रक्रिया केली होती. नंतर जेमतेम 2 वर्षांतच देवीच्या मूर्तीवरील लेप निघायला आरंभ झाला. मूर्तीवर पाढंरे डाग पडायला लागले आणि मूर्तीची झीज होतच राहिली. हिंदु जनजागृती समितीने या रासायनिक प्रक्रियेला विरोध करूनही धर्मसंमत नसलेले हे रासायनिक लेपन भाविकांवर लादले गेले. यानंतर तेथे ही प्रक्रिया आता वारंवार करावी लागत असून मूर्तीची मूळ स्वरूपच पालटले जात आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. असाच प्रकार पंढरपूर येथे होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.
त्यामुळे पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्यापूर्वी मंदिरे समितीने गतवेळच्या लेपनाचा अहवाल घोषित करावा, तसेच ज्यांनी हे लेपन केले त्याला जबाबदार असणार्या अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.वारकर्यांनी स्पर्श करून झीज झाली, असे कारण पुढे करून रासाननिक लेपन केल्याने जर मूर्ती दुखावली गेली, तिच्यावर डाग पडले किंवा तिच्या मूळ रूपात पालट झाले, तर त्याची लेपन करण्याच्या आधी त्याची निश्चिती केली पाहिजे. असे कोणतेही बदल झाल्यास त्यासाठी पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांना तसेच मंदिरे समितीचे प्रशासकीय अधिकारी, समिती सदस्य यांनाही जबाबदार धरण्यात यावे. त्यामुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर केली जाणारी रासायनिक लेपनाची प्रक्रिया घाईघाईत न करता वारकरी संप्रदाय, सर्व विठ्ठलभक्त, संत-महंत, धर्माचार्य यांना विश्वासात घेऊन करायला हवी.या अगोदर केलेल्या प्रक्रियेतून काय साध्य झाले आणि आताची प्रक्रिया का करावी लागत आहे ? हे लेखी सादर करावे. ही प्रक्रिया पारदर्शकतेने करायला हवी.त्याची संपूर्ण माहिती जनते समोर अगोदर मांडायला हवी,अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.