महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्यास सक्षमपणे उभ्या राहिल्या ही अभिमानाची गोष्ट -आ समाधान आवताडे

प्रत्येक गावात बचत गटांना बचत भवन मिळवून देणार- आ आवताडे

महिलां पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्यास सक्षमपणे उभ्या राहिल्या ही अभिमानाची गोष्ट

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यामध्ये ग्राम संसाधन बचत गटांची कामे चांगल्या प्रकारे सुरू असून सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुका हा कर्जवाटप व वसुलीमध्ये नंबर एक वर असल्याने या गटांना काम करताना आणखी हुरूप येण्यासाठी प्रत्येक गावामध्ये हक्काची जागा मिळणे गरजेचे आहे.बचत भवनासाठी माझ्याकडे अनेक ग्राम संसाधन बचत गटांनी मागणीही केली असून येत्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक गावात या ग्रामसंसाधन गटांना हक्काची इमारत मिळवून देणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले. ते मंगळवेढा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मंगळवेढा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी योगेश कदम, माजी सभापती प्रदीप खांडेकर, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजित जगताप,नगरसेवक प्रवीण खवतोडे, सचिन चौरे, दयानंद सरवळे, लिंगराज सरणार्थी, विलास दुपारगुडे,तायप्पा करे,उमेश डांगे, नम्रता काटकर, सविता खुळे, स्वप्नाली भगत, सुनील थोरबोले ,आकाश डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ समाधान आवताडे म्हणाले की मंगळवेढा तालुक्यामध्ये १६०५ बचत गटांची स्थापना झाली असून त्यामधून १६ हजार १२९ महिला सदस्य म्हणून काम करत आहेत त्याचबरोबर ८८ महिला ग्राम संघ स्थापन आहेत. सुमारे १६ हजार महिला एकत्र येत व्यवस्थित काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. महिलांनी चुल व मुल यातून बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या संसाराचा गाडा ओढण्यास त्यांचा सोबत सक्षमपणे उभ्या राहिल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. तालुक्याला १७ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना या तालुक्यांमध्ये ३३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून वसुलीही वेळच्या वेळी सुरू आहे. सुरुवातीला आम्हाला कर्ज द्या म्हणून आपणाला बँकेच्या दारात जावे लागत होते मात्र सध्या आमच्या बँकेचे कर्ज घ्या म्हणून बँका उमेद अंतर्गत सुरू असणाऱ्या बचत गटांच्या दारात येत आहेत ही अभिमानाची गोष्ट असून इतक्या महिलांनी एकत्र येऊन व्यवस्थित काम करणाऱ्या या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला तुमचा अभिमान आहे.या बचत गटांना वाव देण्यासाठी मी सर्वप्रकारची मदत करण्यास तयार आहे. पंढरपूरला लवकरच नवीन एमआयडीसी होत असून सुमारे चार हजार महिलांना रोजगार मिळेल अशा प्रकारचा उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे .बचत गटांनी अनेक प्रॉडक्ट बनवण्याचे काम सुरू केले असून त्यांचे ब्रँडिंग करण्यासाठी व्यवस्थित प्रॉडक्ट बनवणे गरजेचे असते. त्यासाठी लागणारी मदतही मी करण्यास तयार आहे. देश पातळीवरल बचत गटांच्या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त मंगळवेढा तालुक्यातील बचत गटांनी सहभागी व्हावे व आपल्या तालुक्याचे नाव देश पातळीवर जावे यासाठी सर्व बचत गटांनी कामाला लागावे अशा सूचनाही आमदार आवताडे यांनी उपस्थित महिलांना दिल्या.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe