ना फटाक्यांची आतिषबाजी, ना मोठा डामडौल, बीजतुला आणि वृक्षतुला करून लेकीचा वाढदिवस साजरा!
वन्यजीव प्रेमी सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे यांचे शिरूर तालुक्यातील तागडगाव येथे सर्पराज्ञी नावाचा प्रकल्प आहे. जखमी वन्य जीवांवर इथं उपचार केले जातात, आणि वन्य जीव बरे झाल्यानंतर पुन्हा त्यांना आदिवासात सोडले जाते. याच अनुषंगाने लेकीचा वाढदिवस देखील निसर्ग उपयोगी व्हावा म्हणून या दाम्पत्यानी हा अनोखा उपक्रम हाती घेत लेकीचा वाढदिवस साजरा केला.
या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सर्पराज्ञी सोनवणेची बीजतुला करताना अनेक प्रकारच्या वृक्षबियांचा वापर करण्यात आला. यात सामान्यपणे आढळणार्या तसेच दुर्मिळ अति दुर्मिळ सोनसावर, कौशी, वायवर्ण, निर्मली, लाल हादगा, कोशिंब, बिबवा, काटेसावर, पांढरा पांगारा, पिवळा पळस, ताम्हण, तांबडा कुडा, आदीवृक्षांचा बियांचा वापर करण्यात आला.
एरवी वाढदिवस म्हटलं की मोठा डामडौल आणि गाजावाजा करुन पैशाची उधळपट्टी करण्याचे फॅड बीड सगळीकडे आहे. मात्र निसर्गाचे जतनही तितकेच महत्वाचे आहे, असा संदेश देत सोनवणे दाम्पत्यांनी एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.