२४ वर्षीय खेळाडू होणार भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार; दिग्गज खेळाडूचे मोठे विधान


मुंबई : १५ जानेवारीच्या संध्याकाळी भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने केलेल्या एका घोषणेने संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. टी-२० क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याला एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले. आता कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार होत असल्याची घोषणा कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. त्याने कर्णधारपद सोडल्यानंतर लगेच भारताच्या पुढील कसोटी कर्णधाराचा शोध सुरू झाला. नेटकऱ्यांसह अनेक दिग्गजांनीही त्यांना वाटणाऱ्या खेळाडूची नावे जाहीर केली. माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यामते रिषभ पंत कसोटी कर्णधारपदासाठी योग्य दावेदार असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वाचा- विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

रिषभ पंतबद्दल बोलायचे झाले, तर तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो आणि त्याने आतापर्यंत कारकिर्दीत अनेक पराक्रम केले आहेत. कर्णधार असताना त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली कामगिरी केली, पण पंतसमोर रोहित शर्मा आणि के.एल. राहुलसारखे दावेदार असतील, ज्यांना मागे टाकणे सोपे नाही.

वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये झाला नवा विक्रम; १४५ वर्षात कधीच असे झाले नव्हते

जबाबदारी दिली तर पंत चांगली कामगिरी करेल
भारताचे माजी कर्णधार गावसकर यांना निवडकर्त्यांनी पंतला पुढील कर्णधार बनवावे असे वाटते. यावेळी त्यांनी मुंबई इंडियन्सचे उदाहरण दिले. २०१३ मध्ये रोहितने मुंबईचे कर्णधारपद स्वीकारले, तेव्हापासून त्याने पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत आणि तो स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. जबाबदारी दिल्यास पंत आणखी मोठी खेळी खेळू शकेल, असेही गावसकर म्हणाले.

वाचा-‘तू पुढच्या कर्णधारासाठी डोकेदुखी सोडली आहे’; कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर अश्विनची प्रतिक्रिया

गावसकर पुढे म्हणाले की, ‘तुम्ही मला विचाराल, तर मी अजूनही रिषभ पंतकडे भारताचा पुढील कर्णधार म्हणून पाहीन. ज्या कारणामुळे रिकी पाँटिंग पायउतार झाला, तेव्हा रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यानंतर त्याच्या फलंदाजीत झालेला बदल पाहा. कर्णधारपदाच्या अचानक जबाबदारीमुळे त्याला छोट्या डावांचे मोठ्या डावात रूपांतर करण्यास मदत झाली. मला वाटते की, रिषभ पंतला जेव्हा जबाबदारी मिळेल, तेव्हा त्याला केपटाऊनसारख्या आणखी अनेक शानदार खेळी खेळताना पाहायला मिळतील.’

वाचा- अ‍ॅशेसमध्ये इंग्लंडचा मानहानीकारक पराभव; ऑस्ट्रेलियाने ४-०ने मालिका जिंकली

गावसकर म्हणाले की, ‘जेव्हा नारी कॉन्ट्रॅक्टर जखमी झाला, तेव्हा टायगर पतौडी वयाच्या २१ व्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीत कर्णधार झाला होता. त्यानंतर त्याने काय केले ते पाहा. त्याने समर्थपणे नेतृत्व केले. मला असे वाटते की, आयपीएलमध्ये रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून आपण जे पाहिले त्यावरून, मला विश्वास आहे की, त्याच्याकडे भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची आणि एक अतिशय रोमांचक संघ तयार करण्याची क्षमता आहे.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: