हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांचा आकडा वाढला
हायलाइट्स:
- हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट
- बाधितांचा आकडा वाढला
- तरीही अधिकाऱ्यांचे नियम झुगारून शहरात भरवला आठवडी बाजार
वसमत तालुक्यातील कुरुंदा गावामध्ये आजपासून पुढील सात दिवसाचा लॉकडाऊन देखील लावण्यात आलेला आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंद केले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारुन हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये मोठ्या संख्येने आठवडी बाजार गजबजला आहे. त्यामुळे या शहरासाठी वेगळी नियमावली आहे का..? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कळमनुरी शहरामध्ये भरलेल्या आठवडी बाजारामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी दिसून आली. त्याचबरोबर काही वेळा तर नागरिकांना कोरोना असल्याचं भान सुद्धा राहिले नाही. अनेक नागरिक बाजारात विना मास्क वावरत होते. त्यामुळे संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर काय कारवाई करणा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये व दुकाने थाटून बसलेल्या व्यापाऱ्यांमध्ये कुठेही शारिरिक अंतर दिसून येत नाहीये. जीव ओतून जिल्हा प्रशासन आरोग्य प्रशासन नागरिकांना वेळोवेळी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहे. परंतु याला काही नागरिक मात्र हरताळ फासत असल्याचे दिसत आहे.