या योजनेतील महिला लाभार्थ्याचे अर्ज भरण्यास कोणत्याही महा-ई- सेवा केंद्र व नेट कॅफे यांनी शुल्क घेऊ नये-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना शुल्क आकारणाऱ्या 2 नेट कॅफे विरोधात गुन्हे दाखल

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व उत्तरचे प्रांताधिकारी सदाशिव पडदूने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सारिका वाव्हाळ यांनी केले गुन्हे दाखल

जिल्ह्यातील प्रत्येक महा-ई-सेवा केंद्र व नेट कॅफेवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे

सोलापूर,दि.7:- राज्य शासन मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राज्यात सर्वत्र राबवत आहे.या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे.या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरत असताना महा-ई-सेवा केंद्र अथवा नेट कॅफे यांनी कोणतेही शुल्क न आकारता मोफत अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याबाबत शासन निर्णन्यावे निर्देशित केलेले आहे. शासन संबंधित सेवा केंद्राला प्रति अर्ज पन्नास रुपये शुल्क देणार आहे.

तरी सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालकांनी अशा लाभार्थी महिलाकडून शंभर रुपये व दोनशे रुपये शुल्क आकारल्या प्रकरणी संबंधित नेट कॅफे चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही महा ई केंद्रावर व नेट कॅफेवर या योजनेचे अर्ज भरण्यास संबंधित महिला लाभार्थ्याकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

सात रस्ता परिसरातील प्रगती नीट कॅफे व योगेश्वर नेट कॅफेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १००/२०० रुपये घेऊन अर्ज भरण्यासाठी शंभर ते तीनशे रुपये आकारले जात असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाकडून सोलापूर उत्तरचे प्रांताधिकारी सदाशिव पडदूणे यांना मिळाली. त्यानंतर प्रांताधिकारी श्री पडदूणे यांनी उत्तर तहसिलदार यांना संबंधित नेट कॅफे कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले. तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी सारिका कल्याण वाव्हाळ यांना संबंधित नेट कॅफे वर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास शुल्क आकारले जात असल्याची खात्री करून गुन्हे दाखल करण्याविषयी निर्देशित करण्यात आले.

उपरोक्त दोन्ही नेट कॅफे मध्ये या योजनेसाठी महिला लाभार्थ्याकडून अर्ज भरण्यासाठी शुल्क आकारले गेले याची खात्री झाल्यानंतर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या मंडलाधिकारी सारिका कल्याण वाव्हळ यांनी सदर बझार पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. ते दोन्ही नेट कॅफे अधिकृत ई महा सेवा केंद्र नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही नेट चालकाविरुद्ध भा न्या सं ३१८(२),३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading