दोन दिवसात संपुर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न – मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव

आषाढी यात्रा संपताच शहर स्वच्छतेच्या कामाला वेग


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


स्वच्छतेसाठी १५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ – पंढरपूर शहरामध्ये दि.१७ जुलै २०२४ रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. या यात्रा कालावधीत सुमारे १५ ते २० लाख वारकरी-भाविक दर्शनासाठी आले आहेत. या येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आषाढी यात्रा संपताच शहर स्वच्छतेच्या कामाला वेग

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी अश्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली.

आषाढी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते.यामध्ये प्रामुख्याने ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांची यावर्षी संख्या जास्त असल्याने वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जात नसल्याने मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासुनच २४ तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असुन याकामी शहरासह ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड,मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी १५०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये ३५० कायम तर ११५० हंगामी कर्मचारी काम करीत आहेत तसेच नदीपात्रातील पाण्याच्या पात्रा लगत पडलेल्या चिंद्या ही गोळा करायचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याधिकारी,कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम स्वच्छता नियंत्रणासाठी काम करीत आहे. ६५ एकर,नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ४१ घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ६ टिपर, ३ कॉम्पॅक्टर,६ डंपिंग ट्रॉली व जेसीबीच्या सहाय्याने दररोज अंदाजे १०० ते १२५ टन कचरा उचलण्यात येत आहे.यात्रा कालावधीत स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी केले आहे.

यात्रा व्यवस्थित पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव,उपमुख्याधिकारी ॲड.सुनिल वाळुजकर,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर,अनिल अभंगराव यांच्यासह पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading