सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव : २० हजारांच्या उपस्थितीत सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभा
समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल – प.पू.स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज
फोंडा गोवा- सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले नगरी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०५/२०२५ – केवळ जप करत बसलो तर काम होणार नाही.भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते,माझे स्मरण कर पण युद्ध कर.स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे आपल्या देशावर काळ्या इंग्रजांची सत्ता होती.आपला देश धर्मशाळा बनला आहे. आता समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या आड येणार्या कायद्यांमध्ये बदल करून देशात कोणते कायदे हवेत, यावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधना, ईश्वराची उपासना आहे. आपण आपल्या व्यक्तीत्वाची बाजी लावून आणि संघटित होऊन परमात्म्याच्या सेवेत स्वतःला अर्पण केले पाहिजे. तर स्वर्णिम काळ दूर नाही, असे मार्गदर्शन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी केले. या वेळी देशविदेशातील २० हजारांहून अधिक हिंदू उपस्थित होते.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील सनातन राष्ट्र संकल्प सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर सनातनचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना,सनातन बोर्डचे प्रणेते पू.देवकीनंदन ठाकूर,अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत पू.रवींद्र पुरी महाराज, आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित श्री श्री १००८ स्वामी बालकानंद गिरीजी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढी मंदिराचे महंत राजूदासजी महाराज, इंडोनेशिया येथील धर्मस्थापनम् फाऊंडेशनचे पू. धर्मयशजी महाराज, स्वामी आनंद स्वरूप आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे दर्शक हाथी हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांमध्ये सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांचीही उपस्थिती होती.
प.पू.गोविंददेवगिरीजी महाराज पुढे म्हणाले, सनातन संस्थेचे कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे आहे.भारत राष्ट्राला एक समजून काम करत आहेत.भगवद्गीता युद्धाच्या भूमीवर सांगितलेला ग्रंथ आहे. सनातन संस्थेनेही या ग्रंथाप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली आहे. मी या महोत्सवामध्ये युद्धकलांचे प्रदर्शन पाहिले.मला वाटते की देशातील सर्व संतांनी त्यांच्या शिष्यांना हे शिकवले पाहिजे.

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा- सतीश महाना विधानसभा अध्यक्ष उत्तरप्रदेश
सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी जागृती करणे आवश्यक आहे. या जागृतीसाठी केवळ वाणी नव्हे, तर साहस आणि शौर्य हेही आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक हिंदूने शक्तीची उपासना केली पाहिजे. सनातन संस्कृतीने नेहमी सर्वांचे हितच चिंतले आहे. तथापि काही पंथांमध्ये अन्य धर्मियांना मारा अशी शिकवण दिली जाते. याविषयी हिंदूंमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.
लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर-अधिवक्ता अश्विनी उपाध्याय
देशात अल्पसंख्याकांची संख्या प्रचंड वाढत असून हिंदूंची संख्या अल्प होत आहे. अल्पसंख्याकांची संख्या कोट्यवधींमध्ये वाढत असतांना त्यांना अल्पसंख्याक कसे म्हणायचे ? अल्पसंख्यांकांमुळेच लव्ह जिहाद,लँड जिहाद, धर्मांतर यांसह अनेक समस्यांना हिंदू बळी पडत आहेत. प्रतिदिन १० हजार लोकांचे धर्मांतर होत आहेत. हवालाद्वारे पैशाचे फंडींग होत असल्याने धर्मांतर होत आहे. घुसखोर सिंगापूर,चीन, अरब राष्ट्रात घुसखोरी न करता ते भारतातच का येतात ? कारण काँग्रेसने केलेल्या अनेक कायद्यांद्वारे त्यांना केवळ सुविधाच मिळतात असे नाही तर कायदेशीर संरक्षणही मिळते. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर आहे.
सनातन राष्ट्रासाठी धर्मदूत बनण्याचा संकल्प करूया- सद्गुरु चारुदत्त पिंगळे
भारत ‘सनातन राष्ट्र’ बनवणे, हा संतांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागेल. विभीषण रामनाम घेत होता तो श्रीरामाचा भक्त होता; पण हनुमंताने सांगितले,केवळ रामनाम घेतल्याने प्रभूंची कृपा होणार नाही, तर प्रभूंचे कार्य केले तरच प्रभूंची कृपा होईल.आपल्यालाही आज रामकाजाचा, म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करण्याचा संकल्प करावा लागेल.सनातन राष्ट्रासाठी धर्मदूत बनण्याचा संकल्प करावा लागेल.
धर्मासाठी हिंदूंना कट्टर व्हावेच लागेल – महंत श्री राजूदासजी महाराज अयोध्या
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये हिंदुत्वाचा जागर होत आहे. हिंदुत्व वाचले, तर राष्ट्र वाचेल आणि भारत टिकला, तर विश्व वाचेल.केवळ सनातन धर्मामध्ये विश्वकल्याणाची भावना आहे. यासाठीच सनातन धर्माचे रक्षण आवश्यक आहे. सर्व संतांनी धर्मरक्षणासाठी भक्तांना जागृत करायला हवे.धर्मासाठी हिंदूंना कट्टर व्हायलाच लागेल.
धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयोगानेच सनातन राष्ट्राची स्थापना- स्वामी बालकानंद गिरीजी महाराज
शंकराचार्यांचे सैन्य असलेल्या आखाड्यांवर आजपर्यंत कोणीही कब्जा करू शकलेले नाही. आज आपल्या हृदयात जागृती आली पाहिजे की, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयोगानेच सनातन राष्ट्राची स्थापना होऊ शकते.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातून विश्व रूपाचे दर्शन मला झाले – सुरेश चव्हाणके
वर्ष २००८ मध्ये भगवा आतंकवाद, साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार अशा प्रकारे हिंदु धर्माची अपर्कीती चालू असतांना मी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांची भेट घेऊन यावर चर्चा केली होती. त्या वेळी त्यांनी दिव्यदृष्टीने जी माहिती दिली, त्याची प्रचिती आजही मला येत आहे. इतर अध्यात्मिक संघटना विज्ञानाच्या आधारे हिंदूंना मार्गदर्शन करतात; मात्र सनातन संस्था ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे ज्ञान देऊन धर्मकार्य करत आहे. खर्या अर्थाने धर्म आणि अध्यात्म यांचा प्रचार करत आहे. यासाठी शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून विश्वरूपाचे दर्शन मला होत आहे.
सनातन संस्थेच्या विचार प्रत्येक हिंदूच्या मनात येईल तेव्हा भारत हिंदु राष्ट्र होईल – स्वामी आनंद स्वरूप
साधू-संतांच्या आखाड्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रत्येकाला सांगितली पाहिजे.मी सनातनच्या साधकांच्या चेहर्यावर तेज पहातो आणि प्रत्येक सनातनच्या साधकामध्ये प.पू.डॉ. आठवले यांना पहातो.सनातन संस्थेचा विचार प्रत्येक हिंदूच्या मनात येईल, तेव्हा भारत हिंदु राष्ट्र होईल.
पुढच्या पिढीला रामायण आणि गीतेच्या शिकवणीपासून वंचित ठेवू नका – पू.धर्मयशजी महाराज
हिंदु धर्म हा हिरा आहे.त्यामुळे त्याचे सतर्कतेने रक्षण करून धर्म पुढे वाढवायचा आहे.आपली मुले सनातन धर्म पुढे घेऊन जाणार आहेत.त्यामुळे मुलांना गीता आणि रामायण तर शिकवावेच लागेल.

