मंगळवेढा परिसरात खाजगी सावकारकी करणार्‍याच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालय पथकाची धाड

मंगळवेढा परिसरात खाजगी सावकारकी करणार्‍याच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाची धाड,खाजगी सावकाराकडून आर्थिक पिळवणूक होत असल्यास लेखी तक्रार करण्याचे केले आवाहन

या धाडीत सावकारकीची मिळाली कागदपत्रे, पुढील कारवाई सुरू…

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह प्रतिनिधी– मंगळवेढा शहर परिसरात सावकारकी करणार्‍या एका 60 वर्षीय व्यक्तीच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात धाड टाकून सावकारी संबंधी कागदपत्रे जप्त केली असून त्याचा अधिक तपास सहाय्यक निबंधक कार्यालयाचे व्ही.व्ही.वाघमारे हे करीत आहेत.

मंगळवेढा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाचे पथक अवैध सावकारकी कागदपत्रांची पडताळणी करताना सहाय्यक निबंधक व्ही.व्ही.वाघमारे व अन्य टिम
(छाया – शिवाजी पुजारी,मंगळवेढा)

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील महमद मुजावर यांनी एका अवैध सावकाराकडून आपणास त्रास होत असल्याची लेखी तक्रार सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे केली होती. त्या अनुषंगाने दि.28 मे रोजी खोमनाळ रोडवरील एका 60 वर्षीय सावकाराच्या शेतातील घरावर पोलिस बंदोबस्तात सहाय्यक निबंधक कार्यालयाचे पथक प्रमुख व्ही.व्ही.वाघमारे,सचिन जाधव, विलास घोडके, वैभव चव्हाण, पंच लिंगाण्णा पाटील, मधुकर भंडगे यांच्या पथकाने धाड टाकली.यामध्ये अवैध कागदपत्रे मिळून आल्याचे सांगण्यात आले असून त्या अनुषंगाने हे पथक कसून चौकशी करीत असून लवकरच पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतपणे सावकारकीचा व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरू आहे. या सावकारकी व्यवसायात पुरूषाबरोबर महिला वर्गही उतरला आहे. 50 हजाराला महिन्याकाठी 10 हजाराचे व्याज आकारले जात असल्याच्याही तक्रारी आहेत.अशांचा शोध घेवून संबंधित कार्यालयाने कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे. गोरगरीबांना आर्थिक चणचण भासल्यानंतर हे लोक खाजगी सावकाराकडून पैसे काढतात. मात्र या गोरगरीबांना हे खाजगी सावकार अक्षरशः आर्थिक पिळवणूक करत असल्याचा समजत आहे.ज्या लोकांचे हे खाजगी सावकार आर्थिक पिळवणूक करीत असतील त्यांनी शिशुविहार येथील सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Back To Top