रेल्वेने आपल्या प्रत्येक धोरणात संवेदनशीलता, उत्तरदायित्व व शाश्वतता यांचा समावेश करणे आवश्यक

रेल्वेने आपल्या प्रत्येक धोरणात संवेदनशीलता, उत्तरदायित्व व शाश्वतता यांचा समावेश करणे आवश्यक

भारतीय रेल्वे : नव्या विकासासोबतच सध्याच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीचीही तितकीच गरज

विशेष संपादकीय लेख

भारतीय रेल्वे ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही,तर भारताच्या सामाजिक -आर्थिक रचनेचा कणा आहे.दररोज कोट्यवधी नागरिकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवणारी ही व्यवस्था देशातील प्रत्येक वर्गाच्या जीवनाशी खोलवर जोडलेली आहे. गेल्या दशकात रेल्वेने अनेक प्रगत उपक्रम राबवत आधुनिकतेकडे वाटचाल केली आहे — बुलेट ट्रेनची संकल्पना असो, अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस असो वा रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण असो.

मात्र या भव्य स्वप्नांच्या गोंधळात सध्याची व्यवस्थाच उपेक्षित ठरत आहे.जर वेळेवर त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, तर विकास केवळ प्रचाराचा विषय ठरेल आणि सामान्य प्रवाशाला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार नाही.

सध्याच्या पायाभूत सुविधांचा उन्नत करणे अत्यावश्यक

रेल्वेच्या अनेक प्रमुख मार्गांवरील पायाभूत सुविधा आजही चिंताजनक आहेत.अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म लहान आहेत, छप्पर अपुरे आहेत,योग्य प्रकाश व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही कमतरता आहे.आधुनिक गाड्या धाववायच्या असतील तर त्या गाड्यांच्या मार्गावरील पायाभूत सुविधा यात रुळ, स्थानकं,सिग्नल प्रणाली आणि देखभाल व्यवस्था याही तितक्याच सक्षम असल्या पाहिजेत.

RAC प्रणालीला नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

RAC Reservation Against Cancellation प्रणाली अनेक वर्षांपासून तशीच आहे.अनेकदा साइड लोअर सीट दोन अनोळखी प्रवाशांना वाटून दिली जाते, आणि त्यात एक महिला व दुसरा पुरुष प्रवासी असल्याचेही अनेकदा आढळते.ही स्थिती अस्वस्थ करणारी असतेच, शिवाय महिला सुरक्षेच्या दृष्टीनेही ही अत्यंत गंभीर बाब आहे.

सरकार महिला सक्षमीकरण आणि सन्मान याबाबत नेहमी बोलत असते मग रेल्वेमध्ये अशी असंवेदनशीलता का ? RAC मध्ये लिंग-संवेदनशील आरक्षण प्रणाली Gender -Sensitive Allocation System लागू केली पाहिजे जेणेकरून महिलांना असुरक्षिततेची भावना न राहता प्रवासाचा आनंद घेता येईल.

स्वच्छता केवळ घोषणांपुरती न राहता प्रत्यक्षात यावी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वच्छ भारत अभियान देशव्यापी चळवळ ठरली,पण रेल्वे मात्र या चळवळीत मागे पडल्याचे चित्र आहे. काही प्रमुख मार्गांवरील गाड्यांमध्ये व स्थानकांवर काही प्रमाणात स्वच्छता आढळते परंतु अनेक लांबपल्याच्या मेल, एक्सप्रेस गाड्यांमध्ये शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.दुर्गंध, अस्वच्छता, तुटलेल्या सुविधा व पाण्याचा अभाव हे आता सामान्यच झाले आहे.

रेल्वेने स्वच्छतेला केवळ पोस्टरवर मर्यादित न ठेवता नियमित वेळेवर तपासणी आधारित मॉनिटरिंग सिस्टम लागू करणे गरजेचे आहे, जे कोच,शौचालय व स्थानकांची स्वच्छता व अवस्था ऑनलाईन पद्धतीने नियमितपणे तपासेल.

वेळपालन – एक मोठे आव्हान

रेल्वेच्या आजवरच्या सर्वात जुन्या आणि मोठ्या अडचणींपैकी एक म्हणजे वेळेचे पालन.आजही अनेक गाड्या २ ते ६ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत.यामुळे पुढच्या कनेक्टिंग गाड्यांचा प्रवास बिघडतो, प्रवाशांचा वेळ,पैसा आणि मानसिक शांती यावर परिणाम होतो.

वेळपालनासाठी रेल्वेने AI आधारित मार्ग व्यवस्थापन प्रणाली Live Crew Monitoring व डिजिटल लॉजिस्टिक कंट्रोल सिस्टम यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

नवे बांधा सोबतच जुने सुधारा हाच मंत्र हवा

रेल्वे जर केवळ नवीन गाड्या व हाई- प्रोफाईल प्रकल्पांवर भर देत राहिली आणि सध्याच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्षित करत राहिली तर नवे आले,जुने गेले अशी अस्थिर परिस्थिती निर्माण होईल.विकास शाश्वत तेव्हाच ठरेल,जेव्हा नवीन निर्मिती बरोबरच जुन्या सुविधांचेही योग्यपणे पुनरुज्जीवन होईल.

           निष्कर्ष

भारतीय रेल्वेसाठी हा काळ केवळ योजनांची घोषणा करण्याचा नाही,तर खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्याचा आहे.प्रवासी सुविधा,वेळपालन ,स्वच्छता, महिला सुरक्षा व तांत्रिक उन्नयन या सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक सुधारणांची नितांत आवश्यकता आहे.

विकासाच्या नावाखाली जर सध्याच्या व्यवस्थेची उपेक्षा केली गेली तर ती केवळ स्वतः:ची फसवणुक आणि नुसताच गाजावाजा ठरेल.म्हणूनच रेल्वेने आपल्या प्रत्येक धोरणात संवेदनशीलता,उत्तरदायित्व व शाश्वतता यांचा समावेश करणे आवश्यक आहे तेव्हाच विकसित भारत हे स्वप्न रेल्वेच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरू शकेल.

Leave a Reply

Back To Top