राज्यातील महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवडीच्या सूचना–सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

राज्यातील सर्व महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवड करण्याच्या सूचना – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

झाडे जगवण्यासाठीही यंत्रणा उभारून नियमित तपासणी करणार

मुंबई, दि. १७ : राज्यातील सर्व महामार्ग, मोठे रस्ते प्रकल्प, राज्य मार्ग आणि ग्रामीण मार्ग यांच्या दुतर्फा देशी झाडांची लागवड करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधितांना पुन्हा सूचना देण्यात येतील. तसेच झाडे लावण्यासोबतच झाडे जगणे महत्वाचे असल्याने त्यासाठी यंत्रणा निर्माण करून झाडांच्या परिस्थितीची नियमित तपासणी केली जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अमोल मिटकरी यांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे आणि रस्ते कामात होणारी वृक्षतोड याबाबत मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. भोसले बोलत होते. यावेळी सदस्य श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे, सतेज पाटील, सदाभाऊ खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला.

रस्ते कामामध्ये एक झाड तोडल्यास दहा झाडे लावण्याचा नियम असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले की, अशा प्रकारच्या अटी, निविदेमध्ये समाविष्ट असतात. पूर्वी झाडे लावण्यासाठी इपिसीच्या माध्यमातून झाडे लावण्याचा निधी ठेकेदाराला दिला जात होता. आता त्यात बदल करून झाडे लावण्याचे पाच टप्पे केले असून प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर निधी दिला जातो. झाडांच्या पुनर्रोपणाविषयही शासन सकारात्मक असून अनेक झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे.शासकीय विश्राम गृहांचे सुशोभीकरण करुन देशी शोभेची झाडे लावण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचेही श्री. भोसले यांनी सांगितले.

झाडे जगवण्यासाठी जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. तसेच ‘एआय’ च्या माध्यमातून जगवण्यात आलेल्या झाडांची माहिती ठेवली जाईल. नियमानुसार झाडे न लावणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येत आहे. आता त्यांना लावलेली झाडे जगवण्याची जबाबदारीही सोपवण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top