विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवावा-डॉ.नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत जैन विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवावा-डॉ. गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी यांच्या १२५ व्या जन्मजयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रम

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,२० जुलै २०२५ : राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी यांच्या १२५ व्या जन्मजयंती महोत्सवा निमित्त आयोजित जैन विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.हा सोहळा महावीर प्रतिष्ठान सॅलेसबरी पार्क,पुणे येथे जिनशासन प्रभाविका प.पू. चैतन्यश्री जी म.सा.यांच्या पावन सान्निध्यात पार पडला.

या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, आमदार चेनसुखजी संचेती, माजी आयएएस अधिकारी विशाल सोळंकी, उद्योगपती राजेंद्र मुनोत,अध्यक्ष साधना सदन विजयकांत कोठारी, अचल जैन,शिवसेना शहर संघटक आनंद गोयल,एकनाथ ढोले,वैभव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सन्मान सोहळा वीतराग सेवा संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,विद्यार्थ्यांनी पालकांच्या ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवत अभ्यासात सातत्य राखावे.कमी मार्क मिळाल्यास मुलांवर मानसिक ताण येऊ नये याची काळजी पालकांनी घ्यावी.सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळावे कारण ते अभ्यासातील लक्ष विचलित करते. दिवसातील २०-३० मिनिटांपेक्षा जास्त सोशल मीडिया वापरू नये.

पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की,मॉडेल पेपर्सचा सराव केल्यास स्मरणशक्ती वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो.अभ्यासात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागे राहिलेल्या मित्रांना देखील सोबत घ्यावे.कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये तर समाजासाठी योगदान देण्याची भावना ठेवावी.

मुलींच्या शिक्षणातील प्रगतीचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की,आज शिक्षणाच्या क्षेत्रात मुली मुलांपेक्षा पुढे आहेत.हे त्यांना करावा लागणाऱ्या संघर्षामुळे शक्य झाले आहे.नवीन शिक्षण धोरणांमुळेही विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होत आहेत.

पालकांनाही संदेश देताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मुलांवर अनावश्यक अभ्यासाचा ताण देऊ नका.त्यांना प्रोत्साहन द्या आणि योग्य वातावरण द्या.मुलांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपल्या समाजासाठी आणि देशासाठी योगदान देण्याची शपथ घ्यावी.

Leave a Reply

Back To Top