भाविकांची गैरसोय नको-रस्ते दुरुस्तीला प्राधान्य द्या : डॉ.नीलम गोऱ्हे

चांदवडच्या रेणुकादेवी मंदिर रस्त्याची दुरुस्ती होणार-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

भाविकांची गैरसोय नको-रस्ते दुरुस्तीला प्राधान्य द्या : डॉ.नीलम गोऱ्हे

नाशिक/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ जुलै २०२५ : चांदवड जि.नाशिक येथील ग्रामदैवत श्री रेणुकादेवी माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.मात्र सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गा वरून मंदिराकडे जाणारे दोन्ही अंतर्गत रस्ते खराब अवस्थेत असल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

ही बाब लक्षात घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी थेट नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

डॉ.गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की,मी स्वतः या मंदिराशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले असून या ठिकाणी आवश्यक ती कामे करण्यासाठी भक्तगण व कार्यकर्ते वेळोवेळी पाठपुरावा करत असतात.सध्या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे भाविकांची गैरसोय होत असून, याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे.

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक जिल्ह्यात विविध रस्त्यांची विकासकामे सुरू आहेत त्याच धर्तीवर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ते रेणुकादेवी मंदिर या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण करणे, तसेच महामार्गावरून मंदिराच्या दिशेने येणाऱ्या प्रवेश रस्त्यावर गतिरोधकांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून संबंधित यंत्रणांना त्वरित आदेश देण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Back To Top