नक्शा कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन कामकाजाला सुरुवात- भूमि अभिलेख उप अधीक्षक पूजा आवताडे

नक्शा कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन कामकाजाला सुरुवात- भूमि अभिलेख उप अधीक्षक पूजा आवताडे

पंढरपूर,इसबावी,भटुंबरे,शेगांव दुमाला येथील पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील स्थावर मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नगर भूमापनाचे काम करण्यात येणार

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.05 :- नक्शा कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील जून 2025 मध्ये सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून ड्रोन सर्वेक्षणाची ओआरआय ( ऑर्थो रेक्टिफाइड इमेज) प्राप्त झाली आहे. त्यानुसार पंढरपूर,इसबावी,भटुंबरे, शेगांव दुमाला येथील पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील स्थावर मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नगर भूमापनाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती भूमि अभिलेख उप अधीक्षक पूजा आवताडे यांनी दिली आहे.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील विस्तारित क्षेत्राचे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित सर्वेक्षण व नगर भूमापन करण्याबाबत नक्शा हा कार्यक्रम केंद्र शासनाकडून एक वर्षाच्या प्रायोगिक तत्त्वावर पंढरपूर येथे पथदर्शी स्वरूपात राबविण्यात येत आहे.यामध्ये पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील नगर भूमापन करण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी १६ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदींनुसार अधिसूचना,नमुना अ मंजूर केली आहे.

नक्शा प्रकल्पाचा नागरिकांना होणारा लाभ या सर्वेक्षणामुळे धारक अधिकारअभिलेखाचे जीआयएस आधारित नकाशा व मिळकत पत्रिका मिळण्यासह मिळकतींचा नकाशा तयार होऊन त्यांचे क्षेत्र व अक्षांश-रेखांश सहित सीमा निश्चित होणार आहे.त्यामुळे मिळकत धारकांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होणार आहे.मिळकत पत्रिकेच्या स्वरूपात अधिकार अभिलेख उपलब्ध झाल्यामुळे मिळकतींचे मूल्यांकन वाढून कर्ज घेणे प्रक्रिया सुलभ होईल तसेच मिळकतीबाबतचे न्यायालयीन दावे कमी होण्यास मदत होईल तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी विकासोपयोगी जीआयएस नकाशांचा आधार,नागरी हक्कांचे संरक्षण आणि सुविधा योजनांचे अचूक नियोजन करता येईल असे श्रीमती आवताडे यांनी सांगितले.

राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त तथा भूमि अभिलेख अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी पंढरपूर येथे दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी भेट देऊन केंद्र शासनाच्या नक्शा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.यावेळी भूमी अभिलेख उप अधीक्षक श्रीमती आवताडे यांनी पंढरपूर नगरपालिका हद्दीत नक्शा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.

पंढरपूर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व सायबर स्विफ्ट इन्फोटेक प्रा लि. या एजन्सी प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन भूमी अभिलेख उप अधीक्षक श्रीमती आवताडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top