अभिनेते ट्रि-मॅन आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं सयाजी शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – सुप्रसिद्ध अभिनेते आणि ट्रि-मॅन म्हणून ओळखले जाणारे, सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या ६६ व्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेच्यावतीनं सयाजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.
आपल्या आजवरच्या जीवनातील कारकिर्दीत उत्कृष्ट अभिनयाचा सुवर्ण अध्याय सयाजी शिंदे यांनी लिहिला आहे. त्यासहित सह्याद्री देवराई च्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात मोलाचं योगदान दिलं आहे.राज्याच्या विविध भागांत ४० हून अधिक देवराई निर्माण करून वृक्षारोपण करण्याचं काम त्यांनी केलं आहे. या कार्यात विकास नलावडे,रवींद्र भैरट यांच्यासारख्या अनेक सहकाऱ्यांची सयाजी शिंदे यांना भक्कम साथ दिली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामात निस्वार्थ भावनेनं कार्यरत असणाऱ्या या तमाम सहकाऱ्यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनापासून कौतुक करतो असे सांगितले.

सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात हिरवाईचं स्वप्न रुजवणारे, महाराष्ट्राचे ट्री मॅन सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास एक लाख झाडं लावण्यात येत आहेत, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अधिक बळकट करण्याचं काम केलं जात आहे.
यावेळी आसाम येथील भारताचे वनपुरुष पद्मश्री जादव पायेंग आणि त्यांची कन्या, आसामी वनराणी मुनमुनी पायेंग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.पायेंग यांनी आसाममध्ये आतापर्यंत जवळपास १२ लाख झाडं लावली आहे,ही खरोखरंच कौतुकास्पद बाब आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं सुद्धा पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत सक्रिय भूमिका घेतली आहे.त्याच दृष्टीकोनातून काल बीड जिल्ह्यात एका दिवसात ३० लाख झाडं लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, विद्यार्थी वर्ग, पोलीस प्रशासन, वन विभाग आदींनी मोलाचा सहभाग नोंदवला आहे. झाड लावणं आणि त्याचबरोबर त्यांना जगवणं हे फार महत्त्वाचं आहे.

आपल्या महायुती सरकारनं या चालू वर्षात राज्यभरात दहा कोटी झाडं लावण्याचा निर्धार केला आहे.यापैकी एक कोटी झाडं एकट्या बीड जिल्ह्यात लावली जाणार आहेत. वन विभागाकडून देशी झाडांची रोपं मोफत देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे.पुढील चार वर्षांत जास्तीतजास्त झाडं लावण्याचा आमचा मानस आहे.त्याप्रमाणे ती झाड जगवणं, हा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
