अंबरनाथ ची ओळख ही एमआयडीसी तसेच प्राचीन शिवमंदिरामुळे होती, ती आता या न्यायमंदिराने देखील होईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या न्याय मंदिरातून लोकांना जलद गतीने न्याय मिळणे शक्य होईल याचे समाधान – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चिखलोली अंबरनाथ,दि.०९/०८/२०२५ – अंबरनाथ येथील चिखलोली येथे उभारण्यात आलेल्या नवीन दिवाणी आणि कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी हे न्याय मंदिर सुरू होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अंबरनाथ शहराची ओळख ही येथील एमआयडीसी तसेच प्राचीन शिवमंदिरामुळे होती, ती आता या न्यायमंदिराने देखील होईल असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.गेल्या काही वर्षात मीरा भाईंदर, ठाणे आणि अंबरनाथ येथे नवीन न्यायालये सुरू झाली आहेत तर उद्या जव्हारमध्ये नवीन न्यायालयाच्या इमारतींचे उद्घाटन होत आहे. या न्याय मंदिरातून लोकांना जलद गतीने न्याय मिळणे शक्य होईल याचे समाधान वाटत असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

न्यायव्यवस्था अधिक सुदृढ,सक्षम आणि गतिमान व्हावी याला सरकार म्हणून आमचे प्राधान्य आहे.त्यामुळेच न्याय प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी लागेल ती सर्व मदत आम्ही केली असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींनी केलेली मागणी मान्य करत कल्याण येथील कोर्टाच्या १३० वर्षे जुन्या इमारतीचा प्रश्नात लक्ष घालून तिथेही सुसज्ज इमारत उभी करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक,न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे,न्यायमूर्ती अद्वय सेठना,ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, बार कौन्सिल गजानन चव्हाण, उल्हासनगर बार कौन्सिलचे संजय सोनावणे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे तसेच सर्व न्यायाधीश, वकील आणि कोर्टातील कर्मचारी उपस्थित होते.
