गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा – सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे

गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा – सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे

डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा

पंढरपूर,ज्ञानप्रवाह न्यूज,दि.22:-पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वधर्मीय सण, उत्सव आतापर्यंत उत्साहाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरे झाले आहेत. हीच परंपरा कायम ठेवत यंदाचा गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात तसेच डॉल्बीमुक्त वातावरणात साजरे करावेत,असे आवाहन सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सण उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक रखुमाई पोलीस संकुल येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती .यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दीपक धोत्रे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, टी वाय मुजावर,पोलीस पाटील, रेखा घनवट, मूर्तिकार, डीजेचे मालक तसेच शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी सहा. पोलीस अधीक्षक श्री.डगळे म्हणाले, नागरिकांना ध्वनीप्रदुषणाचा त्रास होवू नये यासाठी डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. लेजर शोचा वापर टाळावा. पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करावी. गणेशोत्सवा साठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचा रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत. महिला, वृद्ध व बालके यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपयोजना कराव्यात.गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांसाठी जे मार्ग तसेच विसर्जनाची जागा निश्चित केले आहेत त्या ठिकाणीच विसर्जन करावे तसेच मिरवणुकीसाठी दिलेल्या वेळेची मर्यादा पाळावी.

गणेशोत्सव साजरा करताना कुणाच्याही भावना दुखावणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करु नयेत.मंडळांनी स्वयंसेवक नेमावेत. सीसीटिव्ही लावावेत.जाहिरात फलक लावतांना आवश्यक परवानगी घ्यावी. जाहिरात फलकावरील मजकुर जातीय, धार्मिक द्वेष निर्माण करणारे नसावेत. वर्गणीसाठी कुणावरही जबरदस्ती करु नये, विसर्जनावेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी.उत्सव साजरे करताना कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.

प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे. हा सण सर्वजण जल्लोषात व उत्साहात साजरा करतात. यावर्षीं देखील गणेशोत्सव साजरा करतांना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. गणेश मंडळांनी देखावे, आरास करतांना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवर आधारित आरास करावी.

गणेशोत्सवाबाबत गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अडचणी, सूचनांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नगरपालिका प्रशासनाकडून गणेशोत्सवा निमित्त शहरातील रस्त्यांची डागडुगी, मोकाट जनावरे तसेच आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

यावेळी विविध गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच काही सुचना मांडल्या.

Leave a Reply

Back To Top