रोजगार हमी योजनामंत्री भरतशेठ गोगावले यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी सदिच्छा भेट
पुणे/डॉ.अंकिता शहा,दि.४ सप्टेंबर २०२५: राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवास स्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. पुण्यातील गणपती दर्शनासाठी आलेल्या गोगावले यांनी या भेटीत डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याशी सामाजिक आणि राजकीय विषयांवर सौहार्दपूर्ण चर्चा केली.यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.

याप्रसंगी ना.भरतशेठ गोगावले यांनी डॉ.नीलम गोऱ्हे यांना राज्यातील रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.त्यांनी या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाला चालना देण्याचे सरकारचे धोरण अधोरेखित केले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी ना.भरतशेठ गोगावले यांच्या कार्याचे कौतुक करत पुणे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजनेच्या कामाला उत्तेजन मिळत असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामात महिला मजुरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या दृष्टीने हिताचे निर्णय घेतले जात असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होत असल्याची चर्चा दोघांमध्ये झाली.
ही भेट राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे.यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

