मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी-गटविकास अधिकारी सुशिल संसारे
अभियानात राहणार नागरिकांचा सक्रिय सहभाग; अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर पासून
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/09/2025- ग्रामपंचायत स्तरावर सर्व शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.सदर अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी असून हे अभियान पंढरपूर तालुक्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी दिली.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश गावोगावी सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासाची स्पर्धात्मक भावना रुजवणे हा आहे.या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे सात घटकांवर गुणांकन केले जाणार असून त्यात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित उपक्रम, मनरेगा व विविध योजनांची सांगड, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण आणि उपजीविका विकास व सामाजिक न्यायाचा समावेश आहे.गुणांकनाच्या आधारे ग्रामपंचायतींना राज्य,विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सर्वांग विकास करण्याची जबाबदारी गावस्तरावरील सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी,पदाधिकारी, ग्रामस्तरीय अधिकारी,तरुण मंडळे,सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या लोकसहभागाने करणे अपेक्षित आहे.
या अभियानाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळून ग्रामीण संस्कृतीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी व्यक्त केला.