सोलापूरात झालेल्या प्रचंड पावसामुळे नागरिकांचे हाल
खासदार प्रणिती शिंदे यांची शहरातील विविध भागात पाहणी – तातडीच्या उपाययोजना करण्याचे सोमपा आयुक्तांना निर्देश
केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू अभियान (NCAP) मधून मी सुचवलेली कामे मंजूर न झाल्यास आयुक्तांच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करू– खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि : १२ सप्टेंबर २०२५ – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पाणी साचलेल्या विविध भागांना भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली आणि नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.त्यानंतर त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत आयुक्त डॉ.सचिन ओंबासे आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या,२०१४ साली भाजप सरकार आल्यानंतर दरवर्षी अतिवृष्टीच्या पावसाला सोलापूरकरांना सामोरे जावे लागत आहे.शहराच्या चारी बाजूला पाणी तुंबते पण प्रत्येकवेळी आयुक्त बदलले तरी त्यांच्याखालील अधिकारी चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेतात. १० मार्च २०२३ रोजी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमले असले तरी प्रत्यक्ष अधिकार प्रशासनाकडेच राहिले आहेत. राज्यात गेल्या १५ वर्षांपासून भाजप सत्ता सांभाळत असूनही त्यांनी या गंभीर प्रश्नावर काहीही ठोस उपाययोजना केलेली नाही. अनेक योजना आणल्याचा दावा केला जातो पण प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. त्यांनी पुढे सांगितले की,१०, ११ व १२ जून २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसात तीन तासांत संपूर्ण शहर जलमय झाले होते. जुळे सोलापूर, लेंडकी नाला सेटलमेंट, कुमार चौक यांसह अनेक भागात घरात पाणी शिरले आणि नाले तुंबले. जून २०२४ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी स्वतः अधिकाऱ्यांसह पाहणी केली असता नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही हे स्पष्ट दिसले.मात्र तत्कालीन आयुक्त शितल तेली-उगले यांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन नालेसफाई पूर्ण झाल्याचे दाखवले होते. ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या पावसातही हाच प्रकार नवीन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासोबत घडला. प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झालेलीच नव्हती फक्त कागदपत्रांवर काम दाखवण्यात आले. दरवर्षी अशीच परिस्थिती होत असेल तर नागरिकांनी जायचे कुठे ? गोरगरीबांच्या घरात पाणी शिरते,नाले तुंबतात,आपत्कालीन यंत्रणा कोलमडते याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल करत खासदार शिंदे यांनी तातडीने पंचनामे करून नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
खासदार शिंदे यांनी राज्य शासनाने २०२३ मध्ये शहरातील १९ नाल्यांच्या रुंदीकरण व बळकटीकरणासाठी मंजूर केलेल्या तब्बल ९९ कोटी रुपयांचा मुद्दाही उपस्थित केला. या कामाचे टेंडर झाले असले तरी आजतागायत एक रुपयाचेही काम सुरू झाले नाही.यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी एप्रिल २०२५ मध्ये उघड केले आहे.पुरावे दाखवले असता आयुक्तांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला.आजवर इतका भ्रष्टाचार झाला नाही जितका सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या मिलीभगतीमुळे सध्या सुरू आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

त्यानंतर खासदार शिंदे म्हणाल्या,केंद्र सरकारच्या प्रदूषण महामंडळामार्फत सोलापूर महापालिकेला स्वच्छ वायू अभियानातून (NCAP) शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ६ जुलै २०२५ रोजी ४० कोटी ९४ लाख रुपये मंजूर झाले.मी १६ जुलै रोजी शहरातील विविध विकास कामांचे प्रस्ताव पाठवले होते मात्र या प्रस्तावांचे अंदाजपत्रक तयार झाले नाही. त्याऐवजी सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली नगर अभियंता विभागाने निधीचे मनमानी वाटप करून तीन विधानसभा मतदारसंघांतील १४ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळवून दिली. महापालिकेच्या कागदपत्रांतून ही बाब स्पष्ट झाली आहे.१० ऑगस्ट २०२५ रोजी उपसमितीत प्रस्ताव सादर झाला.२१ ऑगस्ट रोजी खासदार शिंदे यांनी आयुक्तांना फोन करून पूर्वी पाठवलेली यादी पुन्हा व्हॉट्सअँपवर पाठवली. आयुक्तांनी ती आपल्या अधिकाऱ्यांना फॉरवर्ड केली.मात्र २२ ऑगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्तांनी कार्यालयीन मंजुरी देऊन १४ कामांना हिरवा कंदील दाखवला. विशेष म्हणजे निधी केंद्र सरकारचा असतानाही खासदार प्रणिती शिंदे यांनी सुचवलेल्या एकाही कामाचा समावेश यात नव्हता.आश्चर्य म्हणजे २३ ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी प्रभारी नगर अभियंत्यांच्या नावे टेंडर नोटीस तयार करण्यात आली आणि २४ ऑगस्ट रोजी रविवारी ती शहरातील प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित करण्यात आली.२५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत केवळ आठ दिवसांत ठेकेदारांना सहभागासाठी आवाहन करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी उपसमितीने ही कामे मंजूर केली होती, पण १२ ते २१ ऑगस्ट दरम्यान प्रशासन झोपले होते का ? मात्र मी २१ ऑगस्ट रोजी फोन केल्यानंतर या फाईलींना अक्षरशः पाय फुटले आणि विजेच्या वेगाने प्रक्रिया पूर्ण झाली, असा घणाघात खासदार शिंदे यांनी केला.
या प्रकरणी आयुक्तांनी मंगळवारपर्यंत वेळ मागून घेतला असून खासदार प्रणिती शिंदे यांनी सुचवलेली कामे NCAP योजनेत समाविष्ट करण्याबाबत ते विचार करतील असे आश्वासन दिले आहे.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे,शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि काँग्रेस नगरसेवकांनी स्पष्ट इशारा दिला की – NCAP योजनेत सुचवलेली कामे समाविष्ट न झाल्यास आणि टेंडर प्रक्रिया रद्द न केल्यास आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू.
यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे ,माजी महापौर आरिफ शेख, अलकाताई राठोड, मा.नगरसेवक रियाज हुंडेकरी,नरसिंग कोळी,प्रवीण निकाळजे,विनोद भोसले, फिरदौस पटेल,गणेश डोंगरे,तिरुपती परकीपंडला,भीमाशंकर टेकाळे आदी उपस्थित होते.