पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अनुकंपा व सरळसेवा भरतीतील 160 उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम
सोलापूर/जिमाका/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 3 :- सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून दिनांक 17 जुलै 2025 रोजी अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण जाहीर करण्यात आले असून, मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपीक-टंकलेखक परीक्षा 2023 च्या शिफारशीच्या अनुषंगाने उमेदवारांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अनुषंगाने, सोलापूर जिल्ह्यातील गट-क व गट-ड मधील अनुकंपा तत्वावर तसेच एमपीएससीमार्फत सरळसेवा भरतीद्वारे नियुक्ती मिळवलेल्या एकूण 160 उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्याचा भव्य कार्यक्रम शनिवार, दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, विजापूर रोड, सात रस्ता, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे हे उपस्थित राहून सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करणार आहेत.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्ती आदेश प्राप्त उमेदवारांना दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व संबंधित कार्यालय प्रमुख व नियुक्ती प्राधिकारी यांनी विहीत नमुन्यातील मूळ नियुक्ती आदेश दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता समक्ष सादर करण्यात आलेले आहेत.तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.