गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान,सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह -डॉ.सुशील शिंदे

गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह – डॉ. सुशील शिंदे

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : गांधींचे तत्त्वज्ञान आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या चार प्रमुख मुद्द्यांवर आधारलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधींच्या विचारांचा विद्यार्थ्यांपर्यंत पुरेसा प्रसार झालेला नाही, यामुळेच आजच्या पिढीमध्ये उद्दिष्टाभिमुख विचारांचा अभाव जाणवतो. दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवासात महात्मा गांधी यांचा अपमान झाला होता.त्यावेळी त्यांच्यातील आत्मसन्मान जागा झाला.त्यामुळेच त्यांनी आफ्रिकेतील उपेक्षित वंचित घटकांच्या न्याय हितासाठी लढा उभारला, असे मत राजकीय विचारवंत प्रा.डॉ.सुशील शिंदे यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, समारंभ समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते गांधीवादाची आजच्या काळातील प्रस्तुतता या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब बळवंत हे होते.

डॉ.सुशील शिंदे पुढे म्हणाले की,गांधींनी आफ्रिकेतील संघर्षातून आत्मसन्मान व अहिंसेची शक्ती प्रत्यक्षात अनुभवली.फिनिक्स आश्रमातून सर्वोदयाची संकल्पना मांडली आणि सत्य प्रयोगांच्या आधारे सामाजिक परिवर्तन घडविले.फुले, शाहू,आंबेडकर यांसारख्या समाजपुरुषांच्या आत्मसन्मान जागृतीच्या उदाहरणांचा संदर्भ देत त्यांनी गांधीवादाच्या महत्त्वावर भर दिला.भगवद्गीतेतील अनासक्त योगाच्या प्रभावामुळे गांधींच्या विचारांत मानवतावाद व सहिष्णुतेचे तत्त्व प्रबळ झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब बळवंत म्हणाले की,महात्मा गांधींच्या विचारांतूनच राष्ट्राची खरी जडणघडण शक्य आहे.गांधीजीं नी सत्याग्रहाच्या आंदोलनात ७९ हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला होता,ही त्यांच्या कार्यनिष्ठेची साक्ष आहे.आजही गांधीजींच्या विचारांचे प्रत्यक्ष प्रतिबिंब विविध शासकीय योजनांमध्ये दिसून येते.

या कार्यक्रमांतर्गत रयत इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षकेतर सेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समारंभ समितीचे प्रमुख डॉ.दत्ता डांगे यांनी केले. विद्यार्थिनी स्वाती मनगिनी हिने सूत्रसंचालन केले.आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. दत्तात्रेय चौधरी यांनी मानले.या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. समाधान माने, प्रा.डॉ.महादेव कोरी, डॉ.दादासाहेब हाके,डॉ. रमेश शिंदे, डॉ.सुहास शिंदे,प्रा.सागर शिवशरण,प्रा.दत्तात्रय खिलारे, प्रा.बालाजी फुगारे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top