पुरानंतर लगेच स्वच्छतेची योग्य उपाययोजना हाती घेतल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकली नाही
पुरग्रस्त ८२ गावात आरोग्य व स्वच्छतेची व्यापक मोहिम – सिईओ कुलदीप जंगम
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – मानवी आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छतेच्या बाबी पूर्ण करण्यासाठी पुरग्रस्त गावात आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहिम हाती घेणेच आली आहे. पहिल्या टप्यात 53 गावात ही मोहिम राबविण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी, ओढे,नाले भरून वाहत आहेत.पूरग्रस्त भागात स्वच्छतेची कामे व उपाय योजना करण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहिम हाती घेऊन आरोग्य शिबीरे घेण्यात आली आहेत. पूरानंतर आजारांची लागण,पाण्याची दूषितता व घाण साचून राहणे हे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरोग्य व स्वच्छता मोहिम घेण्यात आली आहे.सर्व 82 गावातील सार्वजनिक ठिकाणी मोहिम सुरूच राहणार आहे.

पूरग्रस्त भागात स्वच्छतेची कामे प्राधान्याने घेण्यात येत आहेत.यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून जेसीबी, ट्रॅक्टर घेणेत आले आहेत. जिल्हा परिषदेचे विभाग प्रमख नोडल अधिकारी नेमून दररोज याचा आढावा घेण्यात येत आहे. सार्वजनिक परिसराची स्वच्छता प्राधान्याने करणेत येत आहे. सार्वजनिक इमारती असलेल्या शाळा,अंगणवाडी, आरोग्य केंद्र,तलाठी कार्यालय,ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभुमी या ठिकाणी चिखल साफ करण्यात येत आहे. यासाठी जेटींग मशीन देण्यात आली आहे.टॅंकर द्वारे पाणी फवारून पुर्ण गाळ काढून घेण्यात येत आहे.परिसरातील सांडपाणी व घाण काढण्यात येत आहे.कुजलेल्या अन्न पदार्थाची विल्हेवाट लावणेत येत आहे.काटेरी झाडे, प्लास्टिक संकलन करणेत येत आहे. शासकीय कार्यालयातील फर्निचर भिजलेले आहे त्याची स्वच्छता करण्यात येत आहे.
शौचालयांची व गटारांची सफाई :-
सार्वजनिक शौचालयांची निर्जंतुकीकरण करून वापरासाठी योग्य बनवण्यात येत आहेत. गटारांची सफाई व फवारणी करणेत येत आहे.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ट्रॅक्टर देण्यात आलेले आहेत. तसेच सफाई कर्मचारी देऊन कचऱ्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे.

मृत प्राणी व पक्ष्यांची विल्हेवाट :-
मृत जनावरांचे शव वेळीच हटवणे व योग्य ठिकाणी जाळून किंवा जमिनीत पुरण्यात येत आहे.माणुसकीचे भावनेतून व्यापक स्वरूपात या मोहिमेत सहभागी करून घेणेत येत आहे. जिल्हा परिषदेचे पंचायत अधिकारी व इतर विभगातील कर्मचारी तैनात करणेत आलेले आहेत.
निर्जंतुकीकरण करण्यावर भर
शाळा व अंगणवाडी मध्ये निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. ब्लीचिंग पावडर, फिनाईल, क्लोरीन इ.द्वारे रस्ते, पाणी व सार्वजनिक जागा निर्जंतुक करण्यात येत आहे.
पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी मोहिम
पाण्याच्या टाक्या व विहिरी स्वच्छ करणे. क्लोरीन टॅब्लेट/उकळलेले पाणी वापरण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा बाधित स्त्रोत तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत.पिण्याच्या पाण्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध करून देणेत आले आहेत. कुणीही गढूळ किंवा अस्वच्छ पाणी पिणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.आरोग्य शिबीरातून तशा सुचना देणेत येत आहेत.
डासांपासून संरक्षणावर भर ..
डासमुक्ती मोहिमा हाती घेणेत आली आहे. ग्रामपंचायतीकडे फॉगिंग मशीन उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी फॉगिंग करणेत येत आहे. साचलेले घाण पाण्यात डासांची निर्मिती होऊ नये म्हणून ऑईल फवारणी करण्यात येत आहे.तात्पुरते निवारा केंद्राच्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थापन करणेत आले आहे.ग्रामस्थ या केंद्रातून घराकडे स्थलांतरीत होत आहेत.
पुरानंतर लगेच स्वच्छतेची योग्य उपाययोजना हाती घेतल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन, नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधून कार्यक्षमतेने काम करणेत येत आहे.जी गावे पुरामुळे बाधित झालेली आहेत त्या 53 गावात स्वच्छता व आरोग्य विषयक कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत.