भोसे मध्ये शालेय पोषण आहाराचे धान्य पुरल्याची पालकाची तक्रार
जिल्हाशिक्षणाधिकारी यांची पाहणी – तपासणी करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आलेले शालेय पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना न देता शाळेतच पुरल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी पालकाने केला असून याबाबत पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पाहणी केली. परंतु जागेचा पंचनामा न केल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी भोसे येथील पालक कांचन बाळू कोरके यांनी तक्रार केली आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे रयत शिक्षण संस्थेचे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून येथे जवळपास दोन हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शासनाच्या शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी धान्य मिळते. सदर धान्य अथवा अन्न विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक असताना याचे वाटप करण्यात आले नाही. यामुळे खराब झालेले हे धान्य चक्क विद्यालयाच्या मुतारी जवळ पुरण्यात आल्याचा आरोप पालक कांचन कोरके यांनी केला आहे.

कांचन कोरके यांची दोन मुलं याच विद्यालयात शिक्षण घेत असून त्यांच्याकडे त्यांनी चौकशी असता दोनवेळा जेसीबी व्दारे तांदूळ व डाळ पुरल्याची माहिती त्यांनी दिली. कोरके यांनी देखील शाळेत जेसीबी पाहिला होता.याबाबत त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना थेट फोन लावला.पालकमंत्र्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना याबाबत सूचना करताच शनिवारी त्यांनी शाळेस भेट दिली.

जिल्हा शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी अचानक भेट दिली व चौकशी केली असता मुख्याध्यापक यांनी त्यांना 7 किलो मटकी व 5 किलो मूग खराब झाल्याने पुरल्याची कबुली दिली. मात्र कोरके यांनी, केवळ सात व पाच किलो धान्य पुरण्यास जेसीबीची गरज काय असा प्रश्न केला आहे. किमान वीस पोती धान्य येथे पुरल्याचा त्यांनी दावा केला. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी मात्र सदर जागेस केवळ भेट दिली. या ठिकाणी खोदून पाहिले नसल्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सचिन जगताप यांनी 2023-24 सालातील शालेय पोषण आहाराची नोंदवही ताब्यात घेतली असून याची तपासणी करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
दोनवेळा जेसीबी व्दारे तांदूळ व डाळ पुरल्याची माहिती पालक सांगत आहेत याबाबत रयत शिक्षण संस्थेचे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी खुलासा करणे गरजेचे आहे.