सरकार पूरग्रस्तांसाठी कटिबद्ध : जयकुमार गोरे

पूरानंतर नवजीवनाची दिवाळी — सरकार पूरग्रस्तांसाठी कटिबद्ध : जयकुमार गोरे

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१९ : माढा तालुक्यातील केवड,उंदरगाव आणि वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी कीट आणि भाऊबीज भेट वाटप करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट ग्वाही दिली की,पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नियमांच्या चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल.

हा उपक्रम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि प्रशासनाने अत्यंत धैर्याने काम केले. आम्ही फुंकर मारण्याचा प्रयत्न केला असून मुख्यमंत्र्यांनी नियमांच्या पुढे जाऊन मदत जाहीर केली आहे. पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत मिळणार आहे.

दिवाळीसाठी खास परिपूर्ण कीट तयार करण्यात आले असून साडी,पॅंट,शर्ट आणि आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला. तसेच घरकुलासाठी जागा व वाळू उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून, द्राक्षबागांचे पंचनामे लवकरच पूर्ण होणार आहेत.सरकारकडून घरांसाठी ₹ १.२० लाख आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेतून ₹ २.५० लाख देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय रस्ते,पूल दुरुस्ती, विद्युत पंपांचे पुनर्बांधणी आणि जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन या बाबींवर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार आहे.

आमदार अभिजीत पाटील यांनी पूरग्रस्तांना प्राथमिक मदत दिली असल्याचे सांगून जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना नवीन जमीन देण्याची गरज व्यक्त केली.

प्रा.शिवाजीराव सावंत (राजवी ऍग्रो) यांनी शासनाच्या प्राथमिक मदतीबाबत समाधान व्यक्त करत अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली तर रणजितसिंह शिंदे (जिल्हा दूध संघ) यांनी पूरातीला ऊस सरसकट तोडण्याची ग्वाही दिली आणि विद्युत मोटारींसाठी नुकसानभरपाईची मागणी केली.

कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजीत पाटील, प्रा.सावंत, अध्यक्ष रणजितसिंह शिंदे,दादासाहेब साठे, नगराध्यक्षा मीनल साठे,पृथ्वीराज सावंत, सरपंच ऋतुराज सावंत,सरपंच कुसुम पाटील,प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसिलदार संजय भोसले,गटविकास अधिकारी महेश सुळे,चेतनसिंग केदार, मुन्ना साठे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

FloodRelief,JaykumarGore,

Leave a Reply

Back To Top