NCAP निधीच्या गैरव्यवस्थेवर खासदार प्रणिती शिंदे आक्रमक — महापालिका आयुक्तांना विचारला जाब


सोलापूरच्या स्वच्छ हवेत राजकीय धूर ? NCAP निधीच्या वापरावर प्रणिती शिंदे यांची कठोर भूमिका

NCAP निधी कुठे गेला? — प्रणिती शिंदे यांचा पालिकेला थेट सवाल,CAG चौकशीची मागणी

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज– सोलापूर शहरातील नॅशनल क्लीन एअर प्रोजेक्ट (NCAP) च्या अंमलबजावणीत गंभीर गैरव्यवस्था, पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनातील निष्काळजीपणा असल्याचे निदर्शनास आणून खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेला पत्राद्वारे जाब विचारला आहे.

खासदार शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, सोलापूर शहरात नॅशनल क्लीन एअर प्रोग्रम (NCAP) च्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आणि अनियमितता दिसून येत आहे. विशेषतः या कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या निधीचा वापर,प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सहभागाच्या अभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून या अंमलबजावणीची जबाबदारी ही आपली आहे तथापि निधीचा वापर कसा आणि कुठे करण्यात आला याबाबत माहिती अत्यंत अस्पष्ट असून नागरिकांना वा लोकप्रतिनिर्धीना याची पुरेशी कल्पना दिली गेलेली नाही. यामुळे निधीच्या प्रभावी वापराबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या प्रस्तावांना प्राधान्य देऊन, इतर पक्षांच्या प्रतिनिधींच्या सूचना दर्लक्षित केल्या जात असल्याचे आढळून आले आहे. ही प्रवृत्ती लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे.
या पार्श्वभूमीवर मी हा विषय लोकलेखा समिती (PAC) समोर मांडलेला असून, नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) यांच्यामार्फत सोलापूरमधील NCAP प्रकल्पांचे कार्यक्षमतेचे लेखापरीक्षण करण्यात यावे,अशी औपचारिक मागणी केलेली आहे.सार्वजनिक निधीचा अपव्यय टाळणे आणि कार्यक्रमाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचवणे ही आपल्या प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.जर या बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही तर मी या विषयावर संसदेत पूढील पातळीवर हस्तक्षेप करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.
आपण या प्रकरणाची गंभीर दखल घ्याल आणि तत्काळ पारदर्शक व उत्तरदायी पावले उचलेल,अशी अपेक्षा आहे. ही कृती सोलापूरच्या नागरिकांचा विश्वास परत मिळविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.



