सर्वाइकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ


महिलांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल – पुणे जिल्ह्यात सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधासाठी जनजागृती व लसीकरण मोहीम सुरू

Deputy CM Ajit Pawar Launches Cervical Cancer Free Pune Campaign

Major Step for Women’s Health: Pune Launches Awareness and Vaccination Drive Against Cervical Cancer
मुंबई,दि.०३ /११/२०२५ : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्वाइकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ.संतोष भोसले, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जीविका फाउंडेशन,युनियन बँक,अमेरिका – इंडिया फाउंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्त्रियांमध्ये होणारा सर्वाइकल कॅन्सर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आजार आहे. एचपीव्ही लस आणि वेळेवर केलेल्या स्क्रीनिंगमुळे या आजाराला प्रभावीपणे प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे या आजाराच्या बाबतीत महिलांमध्ये जनजागृती करणे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी अभियानासंदर्भात सादरीकरण केले.
या प्रकल्पाचा उद्देश सर्वाइकल कॅन्सरच्या संदर्भात प्रतिबंध, जनजागृती, लसीकरण आणि समायोजित स्क्रीनिंगच्या माध्यमातून कॅन्सरचं संपूर्णपणे निर्मूलन करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये लसीकरणाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आशा सेविकांकडून घराघरात जाऊन महिला वर्गासाठी सर्वाइकल कॅन्सर स्क्रीनिंगची माहिती दिली जाणार आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

