माढा तालुक्यात १०० वर्षांतील महापूर; पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची आमदार अभिजीत पाटील यांची भावनिक मागणी
मायबाप सरकारने माढा तालुक्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे — आमदार पाटील यांची ठाम मागणी
माढा / नागपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –माढा तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि सीना नदीला आलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण तालुका अभूतपूर्व संकटात सापडला आहे. सीना नदीची साधारण ९०० क्युसेस पाणी वहन क्षमता असताना एका रात्रीत तब्बल २ लाख १२ हजार क्युसेस पाणी नदीपात्रात दाखल झाले. या भीषण पुरामुळे माढा तालुक्यातील १७ गावे पूर्णतः जलमय झाली.
अनेक गावांमध्ये घरांवर २० ते २५ फूटांपर्यंत पाणी होते. संसारोपयोगी साहित्य,धान्य,जनावरे,शेतपिके वाहून गेली. अनेक कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली असून गावच्या गाव उद्ध्वस्त झाली आहेत.माढा तालुक्यात गेल्या १०० वर्षांत आलेला नव्हता असा महापूर आल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या विनंतीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सीना नदीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. अतिशय भयानक परिस्थितीत नागरिकांनी या संकटाचा सामना केल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार अभिजीत पाटील यांना या पूरग्रस्तांची व्यथा सभागृहात मांडताना भावना अनावर झाल्या.माढा तालुक्यातील नागरिकांचे संसार महापुरात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. शासनाने जाहीर केलेले सध्याचे पॅकेज अपुरे आहे. माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज जाहीर करणे अत्यावश्यक आहे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
आमदार अभिजीत पाटील म्हणाले,मी आमदार म्हणून पूरस्थितीत सलग दहा दिवस नागरिकांच्या सोबत राहून मदतीचा हात दिला.मात्र आता मायबाप सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा आहे.पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे राहावेत,यासाठी शासनस्तरावर मी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.
पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत, मोडकळीस आलेल्या घरांचे पुनर्वसन, शेतीपिकांचे नुकसानभरपाई, तसेच मूलभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

