कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले; महसूल प्रशासनात खळबळ

कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले; महसूल प्रशासनात खळबळ

अतीवृष्टी अनुदान व नोंदीतील गंभीर अनियमितता; चिकलगी येथील तलाठी निलंबित

तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर निलंबित केले,कामचुकार तलाठ्यांमध्ये खळबळ;महसूल प्रशासनात चर्चेचा विषय

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : चिकलगी ता.मंगळवेढा येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी बाळासाहेब कृष्णा कुंभार यांनी आपल्या शासकीय कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसूर केल्याप्रकरणी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. निलंबनानंतर त्यांचे मुख्यालय तहसील कार्यालय, सांगोला असे निश्चित करण्यात आले असून या कारवाईमुळे संपूर्ण महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या आदेशानुसार अतीवृष्टी अनुदान वितरणात अनियमितता, लाभार्थ्यांना शासन नियमापेक्षा कमी रक्कम देणे, नागरिकांशी उध्दट वर्तन करणे तसेच तहसीलदारांच्या आदेशांची चुकीची अंमलबजावणी केल्याचे गंभीर आरोप कुंभार यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय नोंदी करताना मयत व्यक्तीच्या नावाऐवजी जीवंत व्यक्तीचे नाव कमी करणे,वारस नोंद क्रमांक ३२५ नोंदविताना मयत व्यक्ती रेवणसिद्ध चनबसू बिरूणगी यांचा मृत्यू दाखला अपलोड न करता नोंद निर्गतीसाठी पाठविणे, अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

महत्त्वाकांक्षी ई-फेरफार प्रकल्पांतर्गत फेरफार नोंदींचा जलद निपटारा करण्यास जाणीवपूर्वक विलंब करून अडथळा निर्माण केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.या सर्व बाबी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चा भंग करणाऱ्या असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

निलंबन कालावधीत कुंभार यांना सांगोला तहसील कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले असून तहसीलदार सांगोला यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे कामचुकार ग्राम महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी,अशी मागणी या कारवाईच्या निमित्ताने सुज्ञ नागरिकांकडून पुढे येत आहे.

Leave a Reply

Back To Top