मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा-आमदार समाधान आवताडे
या योजनेतून एकही पात्र महिला वंचित राहू नये तसेच या योजनेबाबत दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४- शासनाकडून प्रत्येक समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सुरु आहे. या योजनेत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात जवळपास 98 हजार 856 अर्ज भरुन घेण्यात आले आहेत.अजून उर्वरित पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करुन जास्तीत-जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
महसुल पंधरवडा व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे, तहसिलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, योगेश कदम, मुख्याधिकारी चरणराज कोल्हे, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे,वर्षा पाटील,जगन्नाथ गारोळे तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार आवताडे म्हणाले,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळाला पाहिजे यासाठी जास्तीत-जास्त महिलांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आवताडे यांनी केले.
त्याचबरोबर महसूल विभागाचा महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा होत आहे.महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली असून या योजनेतून एकही पात्र महिला वंचित राहू नये तसेच या योजनेबाबत दक्षता घ्यावी.मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात या योजनेबाबत संबंधित यंत्रणा चांगले काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पंढरपूर तालुक्यात 63860 ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत 10 हजार अर्ज मंजूर करण्यात करण्यात आले असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील जास्तीत-जास्त महिलांना रक्षाबंधन दिवशी लाभ देण्यात येईल. तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी 592 अंगणवाडी सेविकांकडून सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत 34996 अर्ज प्राप्त झाले असून,आतापर्यंत 3982 अर्ज मंजूर करण्यात आले असल्याचे तहसिलदार मदन जाधव यांनी सांगितले तसेच महसूल विभागाचा महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरा होत असून महसूल विभागा कडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबतची माहिती तहसिलदार जाधव यांनी दिली.
तत्पुर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कांचन सिध्देश्वर मोहिते या महिलेचा अर्ज स्वत: आमदार समाधान आवताडे यांनी भरला.
यावेळी मंगळवेढा तालुक्यात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.