महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा उत्सव; 30 आंतरराष्ट्रीय शेफ महाराष्ट्राच्या आदरातिथ्याने भारावले

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा उत्सव; 30 आंतरराष्ट्रीय शेफ महाराष्ट्राच्या आदरातिथ्याने भारावले

नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाचा maharastra sadan जागतिक ठसा: परदेशी शेफनी घेतला मराठी खाद्यसंस्कृतीचा अनुभव

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला जगभरातील 30 नामांकित शेफनी भेट देत महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, परंपरा आणि आदरातिथ्याचे कौतुक केले. जागतिक स्तरावर महाराष्ट्र सदनाचा गौरव.

New delhi news : नवी दिल्ली | दि. ७ — देशाच्या राजधानीतील महाराष्ट्र सदन या भव्य वास्तूने आणि येथील उच्च दर्जाच्या शिष्टाचाराने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंगळवारी जगातील विविध देशांतील 30 नामांकित दिग्गज शेफच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र सदनाला सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्राचे वैभव, समृद्ध परंपरा आणि इथले आपुलकीचे आदरातिथ्य पाहून हे आंतरराष्ट्रीय पाहुणे अक्षरशः भारावून गेले.

महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी या शिष्टमंडळाचे उत्साहात स्वागत केले. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारशाची सविस्तर माहिती परदेशी पाहुण्यांना दिली.

या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलिया, युक्रेन, मॅसेडोनिया,मलेशिया, मालदीव,दक्षिण आफ्रिका,सर्बिया,फिलिपिन्स, उझबेकिस्तान, श्रीलंका,सिंगापूर, व्हिएतनाम,फ्रान्स,दुबई,केनिया, मॉरिशस, इंडोनेशिया यांसारख्या विविध देशांतील 30 पाककला तज्ज्ञांनी महाराष्ट्र सदनाच्या भव्य वास्तूशिल्पाची पाहणी केली. निवासी आयुक्त आर. विमला यांनी महाराष्ट्राची विविधता आणि जागतिक स्तरावर नावाजलेल्या महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती चे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे निवासी आयुक्तांच्या हस्ते सर्व परदेशी पाहुण्यांना पारंपरिक दिवे भेट देऊन करण्यात आलेला सन्मान. भारतीय संस्कृतीत प्रकाश,ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाणारे हे दिवे स्वीकारताना पाहुण्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.

या भेटीदरम्यान विदेशी पाहुण्यांना महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा अनुभव देण्यात आला.श्रीखंड, पुरणपोळी,झुणका-भाकरी,कढी-मसाला भात यांसारख्या पारंपरिक मराठी पदार्थांचा त्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. या चवदार मेजवानीने जागतिक स्तरावरील हे शेफ विशेष प्रभावित झाले.

याशिवाय पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी हिंदी गाण्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.भारतीय संगीताच्या तालावर हे सर्व मान्यवर आनंदाने थिरकत भारतीय संस्कृतीचा अनुभव घेताना दिसले.

निवासी आयुक्त आर.विमला आपल्या मनोगतात म्हणाल्या की,जगभरातील विविध देशांतून आलेल्या प्रतिभावंत आणि कल्पक शेफचे यजमानपद भूषवणे ही महाराष्ट्र शासनासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे, तर देशांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ होते.

या शिष्टमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्र सदनातील शिस्तबद्ध व्यवस्था, स्वच्छता आणि जिव्हाळ्याच्या आदरातिथ्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच सदनातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top