ठाकरे बंधू भेदभाव पसरवत आहेत,आम्ही बंधुभाव पेरतो : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ठाकरे बंधू भेदभाव पसरवत आहेत, आम्ही बंधुभाव पेरतो : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas athawale

मुंबईत भेदभाव नव्हे तर बंधुतेचा विजय होईल : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा विश्वास

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंवर भेदभावाचे राजकारण केल्याचा आरोप करत रिपब्लिकन पक्ष आणि महायुती बंधुभावाची भूमिका मांडत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

Mumbai mahanagarpalika:मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८ : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे Raj Thackeray आणि उद्धव ठाकरे Uddhav Thackeray एकत्र आले असले तरी त्यांनी भाषिक आणि प्रांतभेदाची भूमिका मांडून मुंबईतील सामाजिक वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केला आहे.

मुंबई ही विविधतेने नटलेली महानगरी असून येथे भेदभाव नव्हे, तर बंधुभाव वाढवण्याची गरज आहे.ठाकरे बंधू भेदभावाचे राजकारण करत असले तरी रिपब्लिकन पक्ष आणि महायुती बंधुत्वाच्या विचारावर ठाम असल्याचे प्रतिपादन ना.रामदास आठवले यांनी केले.

मराठी ही आमची मातृभाषा असून आम्हाला तिचा अभिमान आहे. मात्र भाषेच्या नावावर कोणताही भेदभाव आम्ही करीत नाही.आपण सर्व भारतीय आहोत,याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे.मुंबईमध्ये सर्व समाज, भाषा व धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहतात हेच मुंबईचे खरे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंधेरी येथील वॉर्ड क्रमांक ६५ मधील रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार जयंतीलाल गडा यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाला भेट दिल्यानंतर ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी त्यांनी जयंतीलाल गडा यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी ना.रामदास आठवले यांनी अंधेरी आणि धारावी परिसराचा दौरा करत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. धारावीतील वॉर्ड क्रमांक १८६ मधील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार कुमारी स्नेहा सिद्धार्थ कासारे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा विचार घेऊन रिपब्लिकन पक्ष काम करत आहे. त्यामुळे पक्षाने उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती, मुस्लिम अशा कोणताही भेदभाव न करता सर्व समाजघटकांना सोबत घेतले आहे. याच भूमिकेतून गुजराती समाजातील जयंतीलाल गडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुतीत असूनही भाजपने रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिलेली नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाने मुंबई शहरात स्वबळावर १२ उमेदवार निवडणूक मैदानात उतरवले आहेत. उर्वरित २१५ जागांवर महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे ना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांचा या निवडणुकीत पराभव होईल आणि बंधुभावाचा विजय होईल.रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर निवडून येतील तसेच रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा महापौर मुंबईत होईल, असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Back To Top