आकडेच सांगतात…भाजप हरला आहे : जेष्ठ पत्रकार रजनीश राणे यांचे मनोगत

Mumbai election BJP shivsena congress : (एकसंघ) शिवसेनेने भाजपचा पराभवच केला आहे! मुंबई निकालातील हेच वास्तव आहे !!

आकडेच सांगतात…भाजप हरला आहे : जेष्ठ पत्रकार रजनीश राणे यांचे मनोगत

मुंबई महापालिका निवडणूक निकालातून भाजपचा खरा पराभव कसा उघड झाला? आकडेवारीच्या आधारे शिवसेना (एकसंघ) मजबूत असल्याचे स्पष्ट करणारे ज्येष्ठ पत्रकार रजनिश राणे यांचे सखोल राजकीय विश्लेषण. सत्ता स्थापनेतील गणित, मराठी मतदारांचा कौल आणि ठाकरे-शिंदे-भाजप समीकरणावर परखड भाष्य.

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार मुंबई . व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

Mumbai election News: मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –आधी २०२६ ची आकडेवारी लक्षात घ्या, मग २०१७ मध्ये जाऊ…

मुंबई महापालिका निवडणूक निकाल अखेर रात्री उशिरा जाहीर झाला. २२७ नगरसेवकांच्या महापालिकेत सत्तास्थापने साठी ११४ ही मॅजिक फिगर आहे.

आता आधी पुढील गणित लक्षात घेऊ…

भाजप ८९ + शिवसेना २४+ राष्ट्रवादी ०३ = ११६ शिवसेना-ठाकरे ६५ + मनसे ०६ + काँग्रेस २९+ राष्ट्रवादी शप ०१ + समाजवादी ०२ = १०३ एमआयएम : ०८ ( कुणाच्या पारड्यात दान टाकणार?)

पहिल्या गणितानुसार भाजपने महापौर बसवण्याचे ठरवले तरी शिंदे यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर असणार आहे. कारण ११६ हा मॅजिक फिगरच्या काठावरील आकडा आहे. महापौरपद,स्थायी/सुधार समितीपद यापैकी शिंदे काहीही किंवा सर्वकाही मागू शकतात.

शिंदेंचे २४ नगरसेवक त्यांच्याकडेच राहतील, हे दस्तुरखुद्द शिंदेही ठामपणे सांगू शकत नाहीत.एक मोठा गट जर फुटला आणि पुन्हा मातोश्री गृही परतला तर? पडद्यामागे तशा हालचाली सुरू झाल्याच आहेत. तर तसे काही झालेच तर ठाकरे बंधू सत्तेत येतील.

ठाकरे बंधू सहज सत्तेत येतील असेही हे गणित नाही. शिंदे जर भाजपला नडण्याची शक्यता असेल तर त्याच आधारावर काँग्रेसही २९ च्या बळावर ठाकरे यांना खिंडीत गाठू शकते.

मातोश्री आणि वर्षा या दोन्ही बंगल्यावर रात्रीपासूनच खलबते सुरू झाली आहेत. कोण गळाला लागू शकेल याची चाचपणी होऊन यादी तयार होत आहे.

काठावरील मॅजिक फिगरच्या थोडे पार जाण्यासाठी MIM पक्षाला भाजप सोबत घेऊ शकतो. याआधी पाया पडण्याचा प्रयोग यशस्वी झालाच आहे, त्यामुळे ही युती झाल्यास भाजपाई नक्कीच चक्रावणार नाहीत.

सत्तेचा पट अशा तऱ्हेने मांडला जात आहे. भाजपने ठाकरे शिवसेनेपेक्षा फक्त जास्त जागा जिंकल्या आहेत.यातील फक्त हा शब्द लक्षात घ्या.कारण यातच सर्व काही लपलेले आहे आणि ते भाजपही मान्य करेल.

आता जाऊया २०१७ च्या निकालाकडे…तेव्हाची आकडेवारी देतो, म्हणजे भाजप पराभूतच झालाय हे विधान अधिक ठाम होईल.

२०१७ मध्ये महापालिकेतील पक्षीय बलाबल होते…
(एकसंघ) शिवसेना ८४
भाजप ८२

  1. म्हणजे २०२६ मध्ये भाजपच्या फक्त ०७ जागा वाढल्या आहेत. राज्यात, केंद्रात सत्ता, सोबत फोडलेली शिवसेना, जागोजागी केलेले लक्ष्मीदर्शन, तरीही भाजपला गेल्या आठ वर्षात फक्त ०७ जागाच जास्त मिळवत्या आल्या.
  2. आता चित्र थोडे उलटे करूया. २०१७ मध्ये एकसंघ शिवसेना ८४ होती. नंतर ती फुटली/फोडली. आता जर ती एकसंघच असती तर?..आकडे बोलतात शिवसेना ठाकरे ६५ + शिवसेना शिंदे २४, म्हणजे एकूण ८९. याचाच अर्थ २०१७ पेक्षा २०२६ मध्ये ०५ जागा जास्त.
  3. शिवसेना ठाकरे यांना फक्त ६५ जागा मिळाल्या याचा आनंद भाजपने बिलकुल साजरा करू नये. तब्बल ८० टक्के पक्ष फुटल्यानंतरही शिवसेना ठाकरे पक्षाने ६५ जागा जिंकून दुसरा नंबर मिळवला आहे आणि फुटलेल्या/फोडलेल्या ८० टक्के पक्षाला सोबत घेऊनही भाजपला फक्त ०७ जागा जास्तीच्या कमावत्या आल्या आहेत, हे वास्तव स्वीकारणे गरजेचे आहे.
  4. मुंबई महापालिकेत भाजप आपला महापौर बसवणार किंवा बसवेलही कदाचित, पण या निवडणुकीत त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. सुपडा साफ होणार हा दावा आता आकडेवारीनेच खोटा ठरवला आहे. आठ वर्षांच्या सत्ता प्रवासात फक्त ०७ जास्तीचे नगरसेवक जिंकून येत असतील तर ते निर्विवाद यश कसे म्हणायचे?

एकतर हे लिखाण कुठलाही पक्षीय चष्मा लावून केलेले नाही. फक्त आकडेवारी सादर करून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची ज्याची त्याने उत्तरे शोधावीत आणि स्वतःलाच द्यावीत!

आता काही निरीक्षणे…

  1. २०१७ मध्ये MIM पक्षाचे मुंबईत फक्त ०२ नगरसेवक होते. ते आता ०८ झाले आहेत. म्हणजे आठ वर्षात MIM चे ०६ आणि त्याचवेळी भाजपचे ०७ नगरसेवक वाढतात.याकडे गंमत म्हणून पहिले तरी या वाढत्या संख्येकडे गंभीरपणे पाहायला हवे असे नाही का वाटत ?
  2. २०१७ च्या तुलनेत मनसेला फक्त एका जागेची घट झाली आहे. वाढ काहीच नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी गेल्या आठ वर्षातील आपल्या बदलणाऱ्या भूमिकांकडे वळून पाहायला हवे,असे मुंबईकरांना वाटते.किमान या निकालातून तेच अभिव्यक्त होत आहे.
  3. शिवाजी पार्कमधील सभेत राज ठाकरे यांनी मराठी माणसाला अधिक पेटवले हे राजकीय निरीक्षक मान्य करतात. तो पेटलेला मराठी टक्काच यावेळी अनेक भागात एकगठ्ठा खाली उतरला आणिक ठाकरे बंधूंच्या पारड्यात मतदान झाले.
  4. वरळी,प्रभादेवी,दादर,परळ,लालबाग, शिवडी,घोडपदेव हा भाग आजही ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे हे तेथील मराठी माणसांनी दाखवून दिले आहे.
  5. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही, तर फक्त माणसे फोडली हे वास्तव उघड झाले आहे. शिवसेना आजही तेथेच आहे. शिंदे यांची शिवसेना चार नंबरवर फेकली गेली आहे आणि ठाकरे शिवसेना दोन नंबरवर आहे.शिंदे यांनी हे गणित लक्षात घ्यावे. दुसऱ्या पक्षातील माणसे घेऊन फक्त गांडुगर्दी वाढते,असे मत मी मागेच नोंदवले होते. हे विधान प्रत्येक पक्षाने किमान या निकालाच्या निमित्ताने तरी ध्यानात घ्यावे.
  6. स्थानिक प्रश्न आणि उमेदवाराचे कार्य या आधारावर महापालिका निवडणूक होते खरी, पण यंदाच्या निवडणुकीला पक्षीय राजकारण,लक्ष्मी दर्शन, कंबरे खालील राजकीय टीका, अदानी, हिंदू आणि मराठीचा मुद्दा असे अनेक कंगोरे होते.काही नवे चेहरे या सपोर्ट सिस्टिमवर निवडून आले असतील,पण जुने चेहरे त्यांच्यामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे महापालिकेत गेले आहेत.

मराठीचा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरला असला तरी यापुढे कुठल्याच पक्षाने मराठी माणसाला “गृहीत धरू नये” हा धडाच त्यांना मिळाला आहे. मराठी ताकद कमी लेखून चालणार नाही.त्यामुळे भाजप,शिंदे आणि ठाकरे बंधू या सर्वांनीच आता परप्रांतीय ठेकेदारांना जरा दूरच ठेवावे हे त्यांच्यासाठी उत्तम, हाच या निकालातून मराठी माणसांचा इशारा आहे.

  1. राजकारणात मतदारच राजा असतो. नाहीतर तिकडे पुण्यात पवार काका पुतण्या धक्क्याला लागलेच नसते. मात्र या धबडग्यात मतदार राजाचे मतही अनाकलनीय आहे. पुण्यात जेलमधील गुंड निवडून आले म्हणतात. सुसंस्कृत पुण्यात असे घडावे हे धक्कादायकच आहे.राज्यातील एकूण निकालावर नंतर कधीतरी लिहावेच लागेल.
  2. शेवटचे, पण अखेरचे नव्हे! आलेल्या निकालातून शिंदे यांनी जेवढा बोध घ्यायला हवा, तेवढाच बोध ठाकरे बंधू यांनीही घ्यावा.निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजयात या दोन्ही पक्षातील किचन कॅबिनेटचा यत्किंचितही वाटा नाही, हे दोन्ही प्रमुखांच्या लक्षात आले तरी खूप आहे. कार्यकर्त्यांना आत्मचिंतन शिबिर हवे आहे.मुंबईच्या नादात नगरपरिषद निवडणुकांकडे या दोन्ही पक्षांचे कुठलेच नेतृत्व फिरकले नाहीत. किमान आता झेडपी निवडणुकीत तरी बंधूनी सीमोल्लंघन करावे,अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
    पुन्हा भेटू लवकरच.

तोपर्यंत सत्तास्थापनेच्या हालचालींसाठी सर्वांना शुभेच्छा!

सत्ता कुणाचीही येवो, मुंबईत आवाज मराठी माणसाचाच आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे आणि हो, या मराठी माणसांचा आम्हीच लाऊड स्पीकर आहोत या भ्रमात कुणी राहू नये आणि शेखी मिरवू नये.मराठी माणूस हे स्वयंभू देवस्थान आहे!

Leave a Reply

Back To Top