मोबाईलचा वापर गरजेपुरताच ठेवा – डॉ. वीरेंद्रसिंह सोलंकी

मोबाईलचा mobile use वापर गरजेपुरताच ठेवा – डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी

स्क्रीन टाईम टू अ‍ॅक्टिव्हिटी टाईम screen time to activity time अभियानातून विद्यार्थ्यांना मोबाईल व्यसनमुक्तीचा संदेश

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.वीरेंद्र सिंह सोलंकी यांनी स्वेरीत आयोजित स्क्रीन टाईम टू अ‍ॅक्टिव्हिटी टाईम अभियानात केले.

Pandharpur sveri news : पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ जानेवारी २०२६ : विद्यार्थ्यांनी आपले जीवन मोबाईल वापराच्या चाकोरीबाहेर घालविले पाहिजे. सध्याच्या युगात माणूस हा समोरच्या माणसापेक्षा हातातील मोबाईलकडे अधिक लक्ष देताना दिसतो.मोबाईलच्या अतिवापरामुळे सामाजिक, मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा,असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.वीरेंद्र सिंह सोलंकी यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर यांच्यावतीने गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये स्क्रीन टाईम टू अ‍ॅक्टिव्हिटी टाईम या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी डॉ.वीरेंद्र सिंह सोलंकी व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात पंढरपूर शहर मंत्री ऋषिकेश सातपुते यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

जिल्हा संयोजक पवन भोसले यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत गरजू विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

मार्गदर्शन करताना डॉ.सोलंकी म्हणाले की,आजचा युवक सोशल मीडियामुळे अधिक वेगाने धावत असून ऑनलाईन गेम्स, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलचा स्क्रीन टाईम वाढत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व बौद्धिक विकासावर होत आहे.त्यामुळे मैदानी खेळ,योग,प्राणायाम, सामाजिक संवाद,गुरुजन व मित्रांशी संवाद साधणे आवश्यक आहे.मोबाईल पासून काही काळ दूर राहून सामाजिक कार्यात मन गुंतवल्यास मानसिक स्थैर्य टिकून राहते, असे त्यांनी नमूद केले.

संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सांगितले की, कोरोना महामारीपूर्वी स्वेरी कॅम्पसमध्ये मोबाईलचा वापरच नव्हता. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलचा वापर वाढला असला तरी सध्या नियमित शिक्षणात मोबाईल वापरास मर्यादा असून विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार प्राणायाम व शारीरिक उपक्रमांची सवय लावली जाते.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाविद्यालय अध्यक्ष ओंकार माळी,आदित्य कदम,ओम इंगळे,आदित्य मस्के,अदिती भुसनर,ॲड.पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top