माघ यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी मार्ग; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश
२८ जानेवारी सकाळी ६ ते २९ जानेवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकेरी रहदारी; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पंढरपूर माघ यात्रा सोहळ्यादरम्यान भाविकांची सुरक्षितता राखण्यासाठी पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग एकेरी रहदारीसाठी खुला ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. हा आदेश २८ जानेवारी सकाळी ६ ते २९ जानेवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
Pandharpur yatra news:पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२४/०१/ २०२६ : माघ यात्रा magh yatra सोहळा गुरुवार दि.२९ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होत असून या यात्रेचा कालावधी दि.२३ जानेवारी ते ०१फेब्रुवारी २०२६ असा आहे. या कालावधीत लाखो वारकरी व भाविक पंढरपूर शहरात दाखल होत असल्याने गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक बनले आहे.

भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी व भाविकांसाठी बाहेर पडण्याचा एकेरी रहदारी मार्ग म्हणून खुला ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.
हा आदेश दि.२८ जानेवारी रोजी सकाळी ०६.०० वाजता ते दि.२९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
गर्दी नियंत्रणासाठी महत्त्वाचा निर्णय
माघ यात्रा सोहळ्यादरम्यान एकादशी दिवशी चंद्रभागा स्नान करून लाखो भाविक श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतात.यावेळी महाद्वार घाट व आसपासच्या परिसरात प्रचंड गर्दी होत असल्याने चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळी व रस्सीचा वापर करावा लागतो.
भाविकांसाठी नियोजित मार्ग
एकेरी मार्ग लागू झाल्यानंतर स्टेशन रोडकडून येणारे वारकरी व भाविक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, भादुले चौक,नाथ चौक,तांबडा मारुती चौक, महाद्वार चौकमार्गे नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जाऊ शकतील.
प्रदक्षिणा मार्गे येणारे भाविक उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी पोहोचू शकतील.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
पंढरपूर शहरातील रस्ते अरुंद असून येण्या-जाण्याचा मार्ग एकच असल्याने गर्दी वाढते व जीवितहानीचा धोका संभवतो. त्यामुळे हा एकेरी मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ (क) अन्वये आदेश पारित केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

