जुळे सोलापूरमध्ये एसीबीची कारवाई : सोलार अर्ज मंजुरीसाठी प्रति किलो वॅट लाच मागितल्याचा प्रकार उघड

सोलार सिस्टीम Solar system मंजुरी साठी ३ हजारांची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

जुळे सोलापूरमध्ये एसीबीची ACB कारवाई : सोलार अर्ज मंजुरीसाठी प्रति किलोवॅट लाच मागितल्याचा प्रकार उघड

सोलापूर जिल्ह्यात घरगुती सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचा सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडला.आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Solapur crime news : सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज : घरगुती सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.ही कारवाई जुळे सोलापूर येथे करण्यात आली असून आरोपीविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोकसेवक अमित विलास रेडेकर वय ४२ असे असून ते महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर येथे सहायक अभियंता (वर्ग-२) म्हणून कार्यरत आहेत.सध्या ते फ्लॅट नं.५०२, गॅलेक्सी अपार्टमेंट सिंधु विहार, जुळे सोलापूर येथे वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव रेडेकर गल्ली,उचगांव, ता.करवीर जि. कोल्हापूर आहे.

प्रतिकात्मक चित्र

सोलार अर्ज मंजुरीसाठी लाच मागितल्याचा आरोप

तक्रारदार हे ग्राहकांच्या मागणीनुसार घरावर सोलार सिस्टीम बसविण्याचे काम करतात.जुळे सोलापूर येथील एका ग्राहकाच्या घरावर ३.५ किलोवॅट क्षमतेची सोलार सिस्टीम बसविण्यासाठी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता.या अर्जास मंजुरी देण्याची जबाबदारी आरोपी अमित रेडेकर यांच्याकडे होती मात्र अर्जास मंजुरी देण्यासाठी प्रति किलोवॅट १,००० रुपये याप्रमाणे तीन किलोवॅटसाठी एकूण ३,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला.

एसीबीची पडताळणी व सापळा
याबाबत तक्रारदाराने दि. २३ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार दि.२४ जानेवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून ३,००० रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

कायदेशीर कारवाई

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे एसीबी पुणे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील एसीबी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते तसेच एसीबीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

एसीबीचे नागरिकांना आवाहन –
लोकसेवक,शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तसेच त्यांच्यावतीने काम करणारा कोणताही खाजगी इसम जर कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल तर नागरिकांनी अजिबात भीती न बाळगता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच भ्रष्टाचारा विरुद्ध ठोस कारवाई शक्य होत आहे – प्रशांत चौगुले,पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर

घरगुती सोलार सिस्टीमच्या परवानगीसाठी काही रक्कम घेतल्याशिवाय परवानगी मिळत नसल्याचे सोलार सिस्टीम बसविणारे खाजगीत सांगत आहेत.त्याशिवाय ही परवानगी दिली जात नाही अशी माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Back To Top