मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा छापा,4.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा छापा,4.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

मंगळवेढ्यात मरवडे रोडवरील जुगार अड्ड्यावर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा छापा. 4.57 लाखांचा मुद्देमाल जप्त,10 जणांवर गुन्हा दाखल,स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा शहर हद्दीत मरवडे रोडकडे जाणाऱ्या नकाते कॉम्प्लेक्स समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने छापा टाकून ४ लाख ५७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्रतिकात्मक फोटो

या प्रकरणी जागेचा मालक महादेव सावंजी याच्यासह अजय नाईकवाडी, सचिन वाकडे,अजय जाधव,रामचंद्र आवताडे, अरुण डोके,अशरफ मुजावर, विनोद लोकरे,बाबा अवघडे व गणेश कोळी अशा दहा जणांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवेढा शहर परिसरात मरवडे रोडवर तिरट नावाचा जुगार खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे (नेमणूक नियंत्रण कक्ष) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ४.१० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला.छाप्यादरम्यान आरोपी बावन्न पत्त्यांच्या तिरट जुगारात गोलाकार बसून सहभागी असल्याचे आढळून आले. कारवाईत ९ मोबाईल फोन, ६ मोटरसायकली व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधिक्षक कार्यालयास अवैध धंद्यांची माहिती मिळत असताना स्थानिक पोलीस ठाण्याला याची कल्पना कशी येत नाही ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. ही घटना शहर हद्दीत घडल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर संशय व्यक्त केला जात असून अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधिक्षक विरेश प्रभू कार्यरत असताना त्यांच्या कार्यकाळात संबंधित बीट अंमलदारांना जबाबदार धरून कारवाई केली जात होती त्यामुळे अवैध धंदे जवळपास हद्दपार झाले होते. सध्याचे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनीही हाच पॅटर्न राबवावा, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून होत आहे. यामुळे अवैध धंद्यांवर आळा बसेल आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Back To Top