सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाची कारवाई; 16 हजारांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

पंढरपूर उपविभागीय पोलीसांची धडक कारवाई; लक्ष्मी टाकळी येथे अवैध दारू विक्रेत्यास रंगेहात अटक

सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाची कारवाई; 16 हजारांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ जून २०२६ : पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई करण्यात आली.लक्ष्मी टाकळी गावातील हॉटेल शाही दरबार परिसरात एका व्यक्तीकडून अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती.

सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे

मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. १३ जून रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या कार्यालयातील विशेष पथकाने घटनास्थळी छापा टाकला. श्रीराम नगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या पत्राशेड जवळ एक संशयित इसम पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी तत्काळ त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने आपले नाव शरद बाळासाहेब रणदिवे रा.क्रांतीवीर लहुजी वस्ताद नगर टाकळी रोड पंढरपूर असे सांगितले. त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.या मद्य साठ्याची एकूण किंमत १६ हजार ३० रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोहेकॉ.ताजुद्दीन मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यावेळी पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की,आपल्या परिसरात अवैध दारू विक्री, मटका, जुगार किंवा इतर कोणतेही बेकायदेशीर धंदे सुरू असल्यास पोलीसांना तत्काळ माहिती द्यावी. समाजविघातक कृत्ये करणाऱ्यां विरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकारच्या गुन्हेगारीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही.

सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. ताजुद्दीन मुजावर, पोना.गायकवाड,पोकॉ.राहुल लोंढे आणि पोकॉ.हुलजंती यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Back To Top