पालघर पोलिसांची मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट WhatsApp खाते तयार करून ५० हजारांची फसवणूक करणारे झारखंडमधून जेरबंद
जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो वापरून ऑनलाइन फसवणूक; पालघर पोलिसांनी आरोपींकडून १००% रक्कम केली हस्तगत
पालघर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ जून : पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून एका नागरिकाची ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पालघर पोलिसांनी झारखंड राज्यातून अटक करत फसवणुकीची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वागुळसार पालघर पश्चिम येथील विनीतकुमार मुंशीलाल मीणा (वय २८) यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी पालघर जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप प्रोफाइल तयार करून जिल्हाधिकारी श्रीमती इंदूर आणि जाखड असल्याची खोटी ओळख निर्माण करून संपर्क साधत विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी बँक खात्यावर ५० हजार रुपये पाठविण्याची मागणी केली. विश्वासात आलेल्या फिर्यादीने संबंधित खात्यावर रक्कम हस्तांतरित केली.

नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करून पोलिसांनी झारखंडमधील धनबाद येथून दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून फसवणुकीची संपूर्ण ५० हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपी बलवंतकुमार कमलप्रसाद मंडल वय २६ आणि राजकुमार दुखन रवानी वय २२ यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख पालघर,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर, अति.कार्यभार सायबर पोलीस स्टेशन पालघर, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले नेम- सायबर पोलीस स्टेशन,पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत,पोलीस उपनिरीक्षक विशाल शिरके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ, पोहेवा/संजय धांगडा, पोहेवा/कपील नेमाडे, नेम- स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोअंम./रामदास दुंगुटे, पोअं./रुपेश पाटील, पोअं./अक्षय शेटये, मपोअं./ऋषिका वारी, मपोअं./स्नेहल शेलार नेम- सायबर पोलीस स्टेशन पालघर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडलेली आहे.

