अमृता फडणवीसांबद्दल गायिकेचे आक्षेपार्ह वक्तव्य: हिंसक भाषेला कोणतेही समर्थन नाही – डॉ.नीलम गोऱ्हे
अमृता फडणवीसांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर डॉ.नीलम गोऱ्हे संतप्त : न्यायाच्या नावाखाली अमानवी भाषा स्वीकारार्ह नाही – डॉ.नीलम गोऱ्हे
सार्वजनिक महिलांविरोधातील हिंसक भाषेचा निषेध; महिला आयोगाने दखल घ्यावी.बलात्कारासारख्या विषयावर बेजबाबदार वक्तव्य समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. भंडाऱ्यातील कार्यक्रमात अमृता फडणवीसां विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यावर डॉ.नीलम गोऱ्हे यांची तीव्र प्रतिक्रिया:महिला आयोगाने तातडीने दखल घ्यावी.
Mumbai news:मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२७ जानेवारी २०२६ :भंडारा येथे आयोजित एका गायन कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह निंदनीय असून त्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही,अशी ठाम प्रतिक्रिया शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत बलात्कारासारख्या अतिशय संवेदनशील विषयावर वापरण्यात आलेली भाषा समाजात अस्वस्थता निर्माण करणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की,अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांवरही सामाजिक जबाबदारी असते.कार्यक्रमातील वक्तव्ये ही संविधानाच्या चौकटीत,कायदेशीर मर्यादेत आणि सामाजिक भान राखून असणे आवश्यक आहे.कोणतीही महिला सार्वजनिक जीवनात कार्यरत असो वा नसो, तिच्याविरोधात दुसऱ्या महिलेने अमानवी,आक्रमक भाषा वापरणे हे संविधानविरोधी आणि मानवी अधिकारांचा भंग करणारे आहे.

पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, बलात्काराच्या बदल्यात बलात्कार किंवा पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट विच्छेदन करण्यासारखी वक्तव्ये समाजाला चुकीच्या दिशेने नेणारी आहेत.अशा भाषेला समर्थन मिळणे म्हणजे हिंसाचाराच्या साखळीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देण्यासारखे आहे. न्याय मागताना अमानवीपणा स्वीकारला जाऊ शकत नाही,हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारांचा आणि महिलांवरील लैंगिक हिंसाचाराचा तीव्र निषेध करताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की,या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संविधानाने कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.ॲट्रॉसिटी कायदा, दलित हक्क संरक्षण आयोग,न्यायालयीन प्रक्रिया या माध्यमांतून न्याय मिळवता येतो.मात्र न्यायाच्या नावाखाली दुसऱ्याच्या मानवी अधिकारांवर आघात करणारी भाषा स्वीकारार्ह ठरू शकत नाही.
या संपूर्ण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घ्यावी तसेच गृह विभागानेही गंभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणी करत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक जीवनातील महिलांबाबत वाढत चाललेल्या ट्रोलिंग,अपमानास्पद वक्तव्ये आणि हिंसक भाषेचा ठाम शब्दांत निषेध केला.

