निवडणूक काळात कोणतीही अनियमितता नको – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्पष्ट निर्देश
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुकानिहाय दौरा करून निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.स्ट्राँग रूम सुरक्षा, आचारसंहिता व पारदर्शक निवडणुकीवर भर
कोल्हापूर/ज्ञानप्रवाह न्यूज/जिमाका,दि. ३१ : जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांनी राधानगरी, भुदरगड,आजरा,चंदगड,गडहिंग्लज आणि कागल या तालुक्यांचा दौरा करून निवडणूक यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेतला.यावेळी त्यांनी मतदान यंत्रांची सुरक्षा,स्ट्राँग रूमची व्यवस्था,टपाली मतदान केंद्रे तसेच आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर विशेष भर दिला.
कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहून त्यांनी कामकाजात अचूकता, पारदर्शकता आणि टीमवर्क राखण्याच्या सूचना दिल्या.सुरु असलेल्या टपाली मतदान प्रक्रियेची पाहणी करताना त्यांनी मतदारांच्या सोयीसाठी योग्य व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले.
प्रत्येक तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेट देऊन त्यांनी निवडणूक प्रक्रियेची सखोल तपासणी केली.विशेषतः स्ट्राँग रूम्सच्या सुरक्षितते बाबत त्यांनी कडक सूचना देत सीलिंग, सीसीटीव्ही कव्हरेज आणि २४x७ सशस्त्र पहारा यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, असे स्पष्ट केले. मतदान यंत्रांची वाहतूक किंवा स्ट्राँग रूम उघडणे-बंद करणे या प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच पार पाडाव्यात, असे आदेशही त्यांनी दिले.
प्रचार प्रक्रियेबाबत बोलताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की,आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व उमेदवार व राजकीय पक्षांना बंधनकारक आहे. प्रचारादरम्यान सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कृती टाळाव्यात. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी भिंतींवर पोस्टर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.उमेदवारांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित असून विनापरवाना सभा किंवा रॅली काढल्यास तात्काळ कारवाई केली जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २४१ उमेदवार तर १२ पंचायत समित्यांच्या १३६ गणांसाठी ४५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्रांवर पाणी,वीज, रॅम्प व स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
निवडणूक ही लोकशाहीची आधारशिला असल्याने पारदर्शक,निर्भय व शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला.अवैध पैसे व दारू वाटप रोखण्यासाठी स्थिर तपासणी पथके व भरारी पथके तैनात करण्यात आली असून प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.
जिल्हास्तरीय माध्यम कक्षाला भेट
निवडणूक प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा माहिती कार्यालयांतर्गत स्थापन जिल्हा स्तरीय माध्यम कक्षाला भेट दिली.यावेळी पेड न्यूज तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यात आली.
बातम्यांच्या स्वरूपात प्रसिद्ध होणाऱ्या प्रचारात्मक जाहिराती आढळल्यास त्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडे त्वरित कळवून उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच फेसबुक, व्हॉट्सॲप,इंस्टाग्राम व एक्स (ट्विटर) वर अफवा,चिथावणीखोर पोस्ट व आचारसंहिता भंग करणाऱ्या मजकुरावर २४ तास लक्ष ठेवण्याचे आदेश देत, दोषींवर सायबर पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या भेटीवेळी उपसंचालक प्रविण टाके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ तसेच माध्यम कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

