मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गा साठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील गॅस टँकर अपघाताची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसी व पोलिसांना विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट परिसरात गॅस टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे हजारो वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या घटनेची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी तसेच पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

अपघातग्रस्त टँकरमधून ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती, ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. वेळेवर योग्य नियोजन न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गा वरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवावी लागली.

एमएसआरडीसी व पोलीस प्रशासनाने सलग २० तास अथक प्रयत्न करून गॅस गळती पूर्णपणे रोखली,असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या कालावधीत प्रवाशांना एमएसआरडीसी कडून पिण्याचे पाणी, बिस्किट्स यांचे मोफत वाटप करण्यात आले.

तसेच वाहतूक व्यवस्था पूर्णपणे पूर्वपदावर येईपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली तात्पुरती थांबवण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ व अंतर दोन्ही कमी होईल, तसेच भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत हा मार्ग प्रभावी पर्यायी वाहतूक मार्ग ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसी व पोलीस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Back To Top