पालघरमध्ये अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; २१.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटकेत
पालघर पोलिसांचा अंमली पदार्थ माफियांवर दणका; १४३ किलो डोडा पावडरसह तिघांना अटक
पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्या तीन आरोपींना पालघर पोलीस दलाने अटक केली असून २१.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Palghar crime:पालघर | ज्ञानप्रवाह न्यूज –पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थां विरोधात कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार पालघर पोलीस दलाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १४३.५१ किलो वजनाचा आणि सुमारे २१ लाख ५२ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाया करण्याच्या स्पष्ट सूचना सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. ०२/०२/२०२६ रोजी कासा पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. मौजे सोमटा गावातील महेंद्र काशीनाथ गुरोडा याने आपल्या घराशेजारील खोलीत प्रतिबंधित अंमली पदार्थ – सुकलेली अफूची बोंडे व त्यापासून तयार केलेली डोडा पावडर अवैध विक्रीसाठी साठवून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कासा पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून अफूजन्य सुकलेली बोंडे व डोडा पावडर असा एकूण १४३.५१ किलो वजनाचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कासा पोलीस ठाणे गु. र. नं. १७/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), १८(ब), २५ व २९ प्रमाणे दि. ०३/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात महेंद्र काशीनाथ गुरोडा रा. सोमटा,ता.जि. पालघर,सुनील बियाराम बिष्णोई रा.सोमटा,जम्म सरोवर हॉटेल, ता.जि.पालघर,बाबूलाल शिवशंकर यादव रा. नालासोपारा,ता.वसई,जि.पालघर यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दि.०७/०२/२०२६ पर्यंत आरोपींची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोनि/अमर पाटील कासा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समिर मेहेर जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोनि/अमर पाटील प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे,पोउपनि/गोरखनाथ राठोड, श्रेपोउपनि/सुनिल नलावडे, पोहवा/४८६ संदिप सुर्यवंशी, पोहवा/५३० दिपक राऊत, पोअं/२०५ वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसेच परि.पोउपनि/मंदार मारकवाड, पोहवा/७४७ संतोष घनदाट, पोहवा/७०५ संतोष जाधव, पोहवा/१०३१ राजु भोये, पोना/२२ वैभव सातपुते, पोअं/११८८ सागर हगारे, पोअं/९४४ योगेश गांगुर्डे, पोअं/५४४ संतोष भोये सर्व नेमणुक कासा पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.






