पंढरपूरमध्ये सखी वन स्टॉप सेंटर–2 चा शुभारंभ: जैनवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर प्रबोधन कार्यक्रम
महिलांसाठी एकाच छताखाली मदत : पंढरपूरमध्ये सखी वन स्टॉप सेंटर–2 कार्यरत
पंढरपूर येथे केंद्र शासनाच्या सखी वन स्टॉप सेंटर–2 चा शुभारंभ करण्यात आला असून जैनवाडी येथील उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांसाठी महिलांवरील हिंसाचार, कायदेशीर मदत व जनजागृतीवर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

Pandharpur sakhi one stop news :पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज: महिलांवरील लिंगाधारित हिंसाचाराला तातडीने आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या सखी वन स्टॉप सेंटर – 2 चा पंढरपूरमध्ये नव्याने शुभारंभ करण्यात आला आहे. हे केंद्र १ डिसेंबर २०२५ पासून पंचायत समिती पंढरपूर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयात कार्यरत आहे.
सखी वन स्टॉप सेंटर ही योजना १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण देशात राबवली जात असून कौटुंबिक हिंसाचार,लैंगिक अत्याचार,मानसिक व शारीरिक छळ, हुंडाबळी,बालविवाह, बाल लैंगिक शोषण अशा प्रकरणांत पीडित महिलांना समुपदेशन,कायदेशीर सल्ला,पोलिस मदत,वैद्यकीय सहाय्य,तात्पुरता निवारा आणि पुनर्वसन अशा सर्व सेवा एकाच छताखाली पुरवण्यात येतात.

ग्रामीण भागातील महिलांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने पंढरपूरमध्ये दुसरे सखी वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे.पीडित महिलांसाठी १८१ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
केस नोंदणी व यशस्वी पुनर्वसन
केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७ केसेस दाखल झाल्या असून त्यापैकी ३ प्रकरणांत समुपदेशनाद्वारे पीडित महिलांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात केंद्राला यश आले आहे. तसेच महिला, विद्यार्थी व युवकांसाठी ६ प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात आले आहेत.
जैनवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
सखी वन स्टॉप सेंटर पंढरपूर–2 च्या वतीने जैनवाडी ता.पंढरपूर येथील उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) शिबिरात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.डॉ. चित्रा जांभळे यांनी गौतम बुद्धांच्या उदाहरणातून शांतता,नम्रता आणि जीवनातील लहान गोष्टींमधून आनंद घेण्याचा संदेश दिला.
यानंतर सखी वन स्टॉप सेंटरचे कार्यालयीन सहाय्यक गणेश बाबर यांनी केंद्राच्या कामकाजाची सविस्तर माहिती देत अडचणीच्या वेळी शिक्षकांशी संवाद साधण्याचे आणि मुलींनी छळाच्या घटनांबाबत महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीकडे जाण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला उमा महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आणि जैनवाडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






