जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : पंढरपूर मध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज – सचिन इथापे

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : पंढरपूर मध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज – सचिन इथापे

पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असून प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

Pandhapur election zp panchayat samity : पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०८ : पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ०८ गटांसाठी व पंचायत समितीच्या १६ गणांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

शनिवार दि.०७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ३०९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत एकूण ६९.४४ टक्के मतदान झाले असून एक लाख ९८ हजार ४६७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १,०५,६५७ पुरुष व ९२,८१० महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय ६६३ टपाली मतदान झाले आहे.मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे सोमवार दि. ०९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होणार आहे.

मतमोजणीसाठी १६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून २ टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी गटासाठी १ व गणासाठी २ अशी एकूण ३ टेबल असणार आहेत. मतमोजणीची प्रक्रिया एकूण १९ फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.

मतमोजणीसाठी १२० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सर्वांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांना मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली असून प्रवेश द्वारावर काटेकोर तपासणी केली जाणार आहे.अधिकृत पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

मतमोजणी केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून त्यांनाच तेथे मोबाईल वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्रत्येक टेबलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असून, फिरती पथकेही कार्यरत राहणार आहेत.
मतमोजणी व्यवस्था,निकाल संकलन, स्ट्रॉंगरूमवरील देखरेख आदी सर्व बाबींची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

Leave a Reply

Back To Top