जीवाची मुंबई अनुभवत माढ्यातील जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची विधानभवनाला भेट
मुंबई सहल:विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहत आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माढ्यातील जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा घेतला अनुभव
Madha news:माढा/ज्ञानप्रवाह न्यूज: माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मुंबईतील विधानभवनाला भेट देत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून पाहिले. आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रिया,शासनाची कार्यपद्धती आणि मुंबई दर्शनाचा अनोखा अनुभव घेतला.

जीवाची मुंबई अन् लहान वयात मोठा अनुभव;थेट विधानभवनाची भेट
माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मुंबईत येत थेट विधानभवनाला भेट देत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून पाहिले.या भेटीतून विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेचा आणि राज्यकारभाराच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

विधानभवनातील सभागृहात कामकाज नेमक्या कोणत्या पद्धतीने चालते, लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न कसे मांडतात आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय कसे घेतले जातात याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी संधी मिळणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

यावेळी माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील Abhijit Patil यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, गावाकडची मुले-मुली मुंबईसारख्या महानगरात येऊन विधान भवनाचे कामकाज पाहतात तेव्हा अभिमान वाटतो. या विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठे होऊन अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात काम करण्याचे स्वप्न पूर्ण करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी जीवाची मुंबई म्हणत मुंबई दर्शनाचा आनंद लुटला. त्यांनी गेट वे ऑफ इंडिया Gateway of India,मुंबई मंत्रालय Mantralaya Mumbai,नरीमन पॉइंट Nariman Point तसेच वानखेडे स्टेडियम Wankhede Stadium यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. याशिवाय मुंबईतील राजकीय नेत्यांची शासकीय निवासस्थाने,मोठ्या उद्योगपतींचे बंगले, सुप्रसिद्ध कलाकारांची घरे,खाऊगल्ली आणि उंच इमारती पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसून येत होता.

या सहलीमुळे विद्यार्थ्यांना शहरांचा वेगाने होणारा विकास, लोकशाही व्यवस्था, शासनाची कार्यपद्धती आणि राज्यकारभार याविषयी प्रत्यक्ष समज मिळाली. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा क्षण कधीही न विसरण्यासारखा ठरल्याची भावना शिक्षकांनीही व्यक्त केली.
यावेळी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे Jaykumar Gore आणि दादा भुसे Dada Bhuse यांच्यासह अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.





