कामकाजातील गंभीर त्रुटी व लाभार्थ्यांच्या तक्रारींमुळे गटविकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख यांची कठोर कारवाई

मंगळवेढा पंचायत समितीत मोठी कारवाई! मग्रारोहयो विभागातील कनिष्ठ सहाय्यक रणजीत वाडदेकर निलंबित

मंगळवेढा पंचायत समितीतील मग्रारोहयो विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

कामकाजातील गंभीर त्रुटी व लाभार्थ्यांच्या तक्रारींमुळे गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांची कठोर कारवाई; कर्मचार्‍यांमध्ये खळबळ

Mangalwedha news:मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा पंचायत समितीच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो/मनरेगा) विभागातील कामकाजात गंभीर त्रुटी आढळून आल्याने कनिष्ठ सहाय्यक रणजीत वाडदेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांनी केली असून या निर्णयामुळे पंचायत समितीतील कामचुकार कर्मचाऱ्यांना मोठी चपराक बसल्याची चर्चा सुरू आहे.

माहितीनुसार रणजीत वाडदेकर यांच्याकडे मंगळवेढा पंचायत समितीतील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या पदावर कार्यरत असताना संपूर्ण विभागाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार वेळेत कार्यवाही करणे अपेक्षित होते.

तसेच मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांबाबत लाभार्थ्यांकडून येणारी देयके नियमांनुसार निश्चित कालावधीत अदा करणे हीही त्यांची जबाबदारी होती. मात्र संबंधित कामकाज वेळेत पूर्ण न झाल्याने लाभार्थी आणि नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या.

या पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारी 2026 रोजी कामकाजातील त्रुटींबाबत संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या दप्तर तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.

या प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांनी कार्यालयीन कामकाजातील विविध त्रुटींसाठी रणजीत वाडदेकर यांना जबाबदार धरत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासना कडून शिस्तभंगाविरोधात कठोर भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे. मनरेगा योजनेतील प्रलंबित कामे व लाभार्थ्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुढील काळात अशा प्रकारच्या कामकाजातील त्रुटींवर प्रशासन अधिक कडक कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Back To Top