पंढरपूरमध्ये १४ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत; बँक,वीज बिल,वैवाहिक वादांसह अनेक प्रकरणे निकाली काढण्याची संधी
पंढरपूरात राष्ट्रीय लोकअदालत १४ मार्चला; जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा – न्यायाधीश ओं.रा.देशमुख
Pandharpur news:पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ : प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढण्यासाठी १४ मार्च २०२६ रोजी पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश ओं.रा.देशमुख यांनी केले आहे.
ही राष्ट्रीय लोकअदालत Maharashtra State Legal Services Authority तसेच Bombay High Court यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात येत आहे.
या लोकअदालतीमध्ये विविध प्रकारची प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कलम १३८ एनआय ॲक्ट अंतर्गत धनादेश प्रकरणे, कामगार वाद, वीज व पाणी देयके,वैवाहिक वाद यांचा समावेश आहे.

याशिवाय भूसंपादनासंबंधी प्रकरणे, बँका,सहकारी बँका व सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त,बँक लवाद दरखास्त तसेच दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे देखील या लोकअदालतीत घेण्यात येणार आहेत.तसेच नगरपालिका कर आकारणी, गाळेधारक प्रकरणे, ग्रामपंचायतीमधील घरपट्टी,पाणीपट्टीच्या थकीत बिलांबाबतची दाखलपूर्व प्रकरणे देखील लोकअदालतीत निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
ज्या पक्षकारांना लोकअदालतीमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन (आभासी) पद्धतीने उपस्थित राहण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या प्रकरणांचा तडजोडीच्या माध्यमातून जलद आणि सुलभ मार्गाने निकाल लावावा, असे आवाहन न्यायाधीश ओं.रा.देशमुख यांनी केले आहे.
