होय..आपण क्षयरोगावर मात करू शकतो,जनभागीदारीच्या सहकार्याने..!
जागतिक क्षयरोग दिन 2026 : TB मुक्त भारतासाठी जनजागृती, वेळेवर निदान आणि पूर्ण उपचार का गरजेचे ?
२४ मार्च २०२६ – दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. 1882 साली डॉ. रॉबर्ट कोच यानी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. क्षयरोग (TB) हा आजही भारतासह जगभरातील एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. मात्र, योग्य वेळी निदान आणि संपूर्ण उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे जनजागृती, वेळेवर तपासणी आणि उपचार पूर्ण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
क्षयरोग म्हणजे काय –
क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो पण शरीराच्या इतर अवयवानाही बाधा करू शकतो. संक्रमित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना हवेतून जंतू पसरतात आणि इतर व्यक्तीना संसर्ग होऊ शकतो.
लक्षणे व ओळख
खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास त्वरित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. सतत खोकला येणे. कफात रक्त येणे. ताप व रात्री घाम येणे. वजन कमी होणे. भूक न लागणे व अशक्तपणा. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर होऊ शकतो आणि इतरानाही संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
निदान व उपचार
भारत सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत क्षयरोगाचे निदान आणि उपचार मोफत
उपलब्ध आहेत. क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. डॉक्टरानी दिलेली औषधे नियमित आणि पूर्ण कालावधीसाठी घेणे अत्यावश्यक आहे. उपचार मध्येच सोडल्यास औषध-प्रतिरोधक क्षयरोग (Drug Resistant TB) निर्माण होऊ शकतो, जो अधिक धाकादायक असतो.
प्रतिबंधात्मक उपाय
खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक झाकावे. मास्कचा वापर करावा. घरात स्वच्छ हवा व पुरेसे वायुवीजन ठेवावे. नवजात बालकांना BCG लस द्यावी. पोषक आहार व निरोगी जीवनशैली अंगीकारावी.
TB मुक्त भारताचे लक्ष्य
भारताने ‘TB मुक्त भारत’ हे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची सक्रिय भूमिका आवश्यक आहे. लवकर निदान, उपचारांचे पालन आणि समाजातील जागरूकता ही या लढ्यातील तीन महत्त्वाची शस्त्रे आहेत.

AI Hand Held X-Ray Machine
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत AI Hand Held एक्सरे मशीन हे एक असे उपकरण आहे जे एक्स-रे प्रतिमां मधील क्षयरोग (टीबी) शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करते. AI Hand Held एक्सरे मशीन बॅटरीवर चालणारी आणि सुवाह्य असल्यामुळे त्यांचा वापर दुर्गम भागात करता येतो. या मशीनने एका वेळी जास्तीत जास्त 100 एक्स-रे काढता येतात. AI Hand Held एक्सरे मशीन द्वारे सन 2025 मध्ये ठाणे ग्रामीण अंतर्गत 15,541 नोंदणी करण्यात आली आहे.
जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांचे आवाहन
क्षयरोग हा लपवण्याचा आजार नाही, तर उपचार करून पूर्ण बरा होणारा आजार आहे. लक्षणे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करा. उपचार पूर्ण घ्या आणि आपल्या कुटुंबाला व समाजाला सुरक्षित ठेवा. आपल्या सहकार्याने आपण निश्चितच क्षयरोगमुक्त समाज निर्माण करू शकतो.जागतिक क्षयरोग दिन हा केवळ एक दिवस नसून जनजागृतीची चळवळ आहे. समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागून, लवकर निदान व पूर्ण उपचार यावर भर दिल्यास क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. ‘जागरूकता, उपचार आणि सहकार्य यामुळेच TB मुक्त भारत शक्य आहे, तरी सर्वांनी मिळून क्षयरोग विषयी गैरसमज दूर करु या असे आवाहन ठाणे जिल्हा क्षयरोग केंद्र जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दिनेश सुतार केले आहे.





